• Sun. Jun 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोह्यात रक्तदान शिबिर; ३० रक्तपिशव्यांचे संकलन

ByEditor

Jun 14, 2026

धाटाव | शशिकांत मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मनसेचे माजी रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रविवारी दि. १४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रोहे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विश्रामगृहा येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर उत्साहात पार पडले.

राज्य रक्त संकलन परिषद, अलिबाग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ३० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. कोरोना काळाचा अपवाद वगळता सन २००९ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहातर्फे सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, आजवर अनेक रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शिवराज पोलसानी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे, धाटाव विभाग अध्यक्ष महेश वाडकर, साहिल म्हसकर , विघ्नेश म्हसकर, रुपेश कोल्हटकर, मयूर कोल्हटकर, नितीन मुंडे, प्रताप खंडारे आणि सुमित कांबळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

यावेळी पत्रकार महादेव सरसंबे, महेंद्र मोरे, रवींद्र कानेकर, सचिन साळुंखे, उद्धव आव्हाड, नितीश सकपाळ आणि महेश मोहिते यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच राज्य रक्त संकलन परिषद, अलिबागचे डॉ. गोसावी व त्यांच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान असल्याचा संदेश देत मनसेच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!