अलिबाग: रायगड पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठी गती देत अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत रविवारी (१४ जून) पहाटे धडक कारवाई केली. या छाप्यात गांजा सेवन करणाऱ्या दोन ज्येष्ठ नागरिकांना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याच ठिकाणी बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या एका युक्रेनियन महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. आणि इमिग्रेशन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारळ येथील ‘इनर सर्कल सोसायटी’मधील रूम क्र. बी-०६ मध्ये काही व्यक्ती अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व मांडवा सागरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी अचानक छापा टाकला.
गांजा ओढताना रंगेहाथ पकडले
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा संबंधित रूममध्ये हायप्रोफाईल पार्टी सुरू असल्याचे समोर आले. तेथे दोन ज्येष्ठ नागरिक कागदी नळीमध्ये भरलेला पदार्थ पेटवून त्याचा धूर ओढताना (अंमली पदार्थाचे सेवन करताना) रंगेहाथ पकडले गेले. अधिक चौकशीत तो पदार्थ ‘गांजा’ असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी सुनील बळीराम चावला (वय ६९, रा. इनर सर्कल सोसायटी, सारळ, अलिबाग) आणि हरेंद्र सिंग मंगल सिंग (वय ६५, रा. वरळी, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून अंदाजे ३ ग्रॅम गांजा, गांजा भरलेल्या कागदी नळ्या आणि लायटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युक्रेनियन महिलेचा व्हिसा संपला, तरीही बेकायदेशीर वास्तव्य
याच कारवाईदरम्यान पोलिसांना घटनास्थळावर युक्रेन देशाची एक महिला आढळून आली. पोलिसांनी तिच्या पासपोर्ट आणि व्हिसाची कसून पडताळणी केली असता, तिचा व्हिसा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १२ जून २०२६ रोजी संपल्याचे उघड झाले. भारतात राहण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे नसताना बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी या परदेशी महिलेविरुद्ध ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५’ च्या कलम २३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
सदर धडक कारवाई रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या यशस्वी मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, सहा. फौजदार प्रसन्न जोशी, किशोर पाटील तसेच पोलीस अंमलदार विनोद पाटील, प्रतीक सावंत, रणजीत खराले, कौस्तुभ मगर, अमोल हंबीर, झुलिता भोईर, चेतन म्हात्रे, अक्षय पाटील आणि अनिकेत म्हात्रे या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अलिबाग परिसरातील या हायप्रोफाईल कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेते आणि सेवन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
