महाड । मिलिंद माने
उन्हाळ्यामुळे नदी, नाले आणि तलाव कोरडे पडू लागल्याने जलचर प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. महाड तालुक्यातील नाते गावातील हनुमान मंदिर परिसरात तब्बल ६ फूट लांबीची मगर लोकवस्तीत घुसल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र, स्थानिक ग्रामस्थ, वन विभाग आणि ‘सिस्केप’ संस्थेच्या तत्परतेमुळे या मगरीचे सुरक्षित रेस्क्यू (बचावकार्य) करण्यात यश आले आहे.
मागील पंधरा दिवसांत नाते आणि कोथुर्डे पंचक्रोशी परिसरात मगर मानवी वस्तीत शिरण्याच्या किंवा रस्त्यावर फिरताना दिसण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रसारमाध्यमांच्या जनजागृतीमुळे गावोगावी मगरीबद्दलची भीती व गैरसमज दूर झाले असून, आता ग्रामस्थ स्वतः पुढाकार घेऊन मगरींचे संरक्षण करताना दिसत आहेत.
मध्यरात्री दत्त मंदिराशेजारी दर्शन
नाते येथील ‘टाकीची आळी’ भागातील दत्त मंदिराशेजारी, बाबू सावंत यांच्या घराजवळील रस्त्यावर मगर आल्याची माहिती श्रीकृष्ण गायकवाड यांनी दिली. माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य ॲड. सुरज जामदार, सुधाकर गायकवाड, रुपेश पवार, गणेश सावंत आणि प्रवीण गायकवाड आदी स्थानिक तरुणांनी एकत्र येत मगर अन्यत्र निघून जाऊ नये म्हणून तिला दोरीच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या पकडून ठेवले.

यानंतर ‘सिस्केप’ संस्थेचे गणेश खातू यांनी आपल्या टीमशी संपर्क साधला. संस्थेचे सदस्य चिराग मेथा, स्मरण शिंदे, ओम शिंदे, धर्मेश मेथा आणि योगेश गुरव हे रेस्क्यूसाठी लागणारे आवश्यक साहित्य व उपकरणे घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले.
गोड्या पाण्यातील ‘मार्श क्रोकोडाइल’
तपासणीअंती ही मगर ‘मार्श क्रोकोडाइल’ (गोड्या पाण्यातील मगर) प्रजातीची असल्याचे स्पष्ट झाले, ज्याची लांबी ५ फूट ९ इंच होती. महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप उतेकर, वनरक्षक अंगद भोसले आणि नाते येथील वनरक्षक आदित्य भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर, मगरीला कोणतीही इजा न पोहोचवता तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
वन विभाग आणि सिस्केप संस्थेचे आवाहन
ग्रामस्थ, वन विभाग आणि सिस्केप संस्थेच्या समन्वयित प्रयत्नांमुळे संभाव्य मनुष्य-वन्यजीव संघर्ष टळला आहे. महाड वन विभाग आणि सिस्केप संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणताही वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्यांना इजा न करता, त्वरित वन विभाग किंवा अधिकृत रेस्क्यू टीमशी संपर्क साधावा.
