म्हसळा । वैभव कळस
दीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज, १५ जूनपासून रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा घंटेचा गजर घुमला असून चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांचे आवार गजबजून गेले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हसळा येथील ‘पीएम श्री’ शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करत ‘प्रवेशोत्सव’ धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.
६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालक शिक्षण प्रवाहात यावा, या उद्देशाने म्हसळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने प्रभात फेरी, विद्यार्थी पदयात्रा, पालकांच्या गृहभेटी, शाळा व परिसर स्वच्छता, तसेच रांगोळी आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप
शाळेच्या पहिल्या दिवशी आयोजित विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, ‘प्रवेशोत्सवा’चे औचित्य साधून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी म्हसळ्याचे नगराध्यक्ष सुनील शेडगे, उपनगराध्यक्षा कमल जाधव, पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत शिर्के, माजी अध्यक्ष सुशील यादव, सदस्य अंकुश नटे आणि निता दर्गे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर नगराध्यक्ष सुनील शेडगे आणि सुशील यादव यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक नरेश मुंडे, जयश्री गायकवाड, इंदिरा चौधरी, श्रीधर उमदी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

