रायगड : पनवेल जवळील ‘पीएमश्री’ रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. शाळेतील इयत्ता चौथीच्या एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदलांबाबत या चिमुकलीने विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आणि कौतुकाने उत्तरे दिली. विद्यार्थिनीचा दांडगा आत्मविश्वास आणि मुख्यमंत्र्यांचा सहज संवाद या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला.
या सोहळ्याला माजी खासदार रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
संघर्ष अपरिहार्य, पण चांगलं काम करत राहा: मुख्यमंत्री
आपल्या सार्वजनिक जीवनातील प्रवासाचा उलगडा करताना मुख्यमंत्री म्हणाले, “विद्यार्थी दशेत ‘भारतीय विद्यार्थी परिषदे’त काम करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता सोडवता माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरू झाला. समाजात सकारात्मक बदल घडवून आणताना संघर्ष अपरिहार्य असतो. मात्र, चांगल्या कार्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते.” यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे आवाहन केले.
‘आयडियल सेंटर लॅब’चे उद्घाटन; डिजिटल शिक्षण काळाची गरज
कार्यक्रमादरम्यान शाळेतील अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर लॅब’चे (डिजिटल लॅब) उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या लॅबची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, “डिजिटल शिक्षण ही काळाची गरज असून भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा तो मुख्य आधार आहे. या डिजिटल लॅबमुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) माध्यमातून कठीण विषय सोपे करून शिकता येतील. तसेच प्रश्नोत्तरे, स्वमूल्यमापन आणि ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील शिक्षण अधिक दर्जेदार व आकर्षक होईल.”
नवागत विद्यार्थ्यांचे ‘औक्षण’ करून स्वागत
शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. सर्व नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करून शिक्षण प्रवाहात त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधत, या डिजिटल लॅबचा नियमित वापर करून आपले ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या.
