• Mon. Jun 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लेझीमचा ताल अन् लक्ष्मीची पावलं; धाटाव केंद्रीय शाळेत चिमुकल्यांचा ‘प्रवेशोत्सव’ ठरला संस्मरणीय!

ByEditor

Jun 15, 2026

धाटाव । शशिकांत मोरे
दीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यभरातील शाळांची घंटा वाजली असून, रोहा तालुक्यातील धाटाव केंद्रीय शाळेत पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे स्वागत एका आगळ्यावेगळ्या आणि अभूतपूर्व ‘शालेय प्रवेशोत्सवा’ने करण्यात आले. नेहमी पहिल्या दिवशी रडत-खडत शाळेत येणारी मुले आज मात्र चेहऱ्यावर हास्य आणि डोक्यावर कागदी टोपी घालून उत्साहाने शाळेची पायरी चढताना दिसली. पुष्पवृष्टी, औक्षण आणि लेझीमच्या तालावर नाचत चिमुकल्यांचा हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

सोमवारी सकाळी १० वाजता मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानिमित्त संपूर्ण शाळा रंगीबेरंगी फुगे, सुबक रांगोळी आणि तोरणांनी नववधूसारखी सजवण्यात आली होती. नवीन प्रवेशित बालकांना कुंकवाच्या लालबुंद पाण्यात पायाचे ठसे उमटवून, ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ सन्मानाने शाळेत आणण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबपुष्प, चॉकलेट आणि नवीन पाठ्यपुस्तकांचा संच देण्यात आला. रोहा पंचायत समितीच्या सभापती विजयाताई पाशिलकर यांच्या हस्ते नवागतांचे औक्षण करण्यात आले.

‘शाळा तुमच्या स्वप्नांना पंख देणारे हक्काचे ठिकाण’: विजयाताई पाशिलकर

याप्रसंगी बोलताना सभापती विजयाताई पाशिलकर यांनी दिवंगत लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “धाटाव शाळेत शिक्षणाच्या सर्व दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत. आजचा हा प्रवेशोत्सव तुमच्या आयुष्यातील एका नव्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. शाळा हे केवळ ज्ञानाचे मंदिर नाही, तर तुमच्या स्वप्नांना पंख देणारे हक्काचे ठिकाण आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणात स्वतःला झोकून देऊन देशाचे यशस्वी नागरिक व्हावे.”

या सोहळ्याला रायगड जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी (शिक्षण विभाग) संजय कवितके आणि रोहा तालुका गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांनी सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. केंद्रप्रमुख नारायण गायकर यांनी परिसरातील शाळांच्या कार्याचा आढावा घेत, धाटाव शाळेच्या प्रगतीची प्रशंसा केली; तसेच पटसंख्या वाढवण्यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या उत्साही वातावरणात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक भोकटे, गणेश कदम, केंद्रप्रमुख नारायण गायकर, मुख्याध्यापिका वनिता पवार, सहशिक्षिका उज्वला गोळे, मोहिनी पाटील, मेघा देवकर, विशेष शिक्षिका कल्पना नागरे, सहशिक्षक राजू वारे, मेघा ठाकूर, पत्रकार शशिकांत मोरे, रुपेश रटाटे यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पत्रकार मोरे आणि रटाटे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात सभापती विजयाताई पाशिलकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वनिता पवार यांनी केले. सहशिक्षिका उज्वला गोळे यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले, तर सहशिक्षक राजू वारे यांनी इंग्रजीतून आभार प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. लेझीमचा ताल, फुलांचा वर्षाव, लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आणि शिक्षकांचा आपुलकीचा हात यामुळे हा प्रवेशोत्सव पंचक्रोशीत चांगलाच रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!