• Mon. Jun 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उन्हाळी सुट्टीनंतर श्रीवर्धन तालुक्यात शाळांची घंटा वाजली; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत!

ByEditor

Jun 15, 2026

श्रीवर्धन । अनिकेत मोहीत
दीर्घ उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आजपासून श्रीवर्धन तालुक्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा गजबजल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात स्वागत करण्यात आले.

शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरावा, यासाठी अनेक शाळांमध्ये ‘स्वागत उत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फुलांनी, शुभेच्छा देऊन आणि विविध आनंददायी उपक्रमांच्या माध्यमातून स्वागत केले. दीर्घ सुट्टीनंतर शाळेत परतलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता.

मोफत पाठ्यपुस्तके, वह्या आणि गणवेशाचे वाटप

महाराष्ट्र शासन आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, वह्या आणि गणवेश उपलब्ध करून देण्यात आले. शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळाले असून, पालकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.

मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न

श्रीवर्धन तालुक्यातील विविध शाळांसह नगरपालिका हद्दीतील शाळांमध्येही विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे आणि शाळांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून आणि शिक्षकांकडून राबविण्यात येत असलेले हे प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहेत.

पहिल्याच दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शासनाच्या विविध कल्याणकारी सुविधा, शिक्षकांचे चोख नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत दिमाखात झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!