उरण । घन:श्याम कडू
उरण विधानसभा मतदारसंघातील शेवा-हनुमान कोळीवाडा परिसरातील ‘मीरा रामकिसन परदेशी’ कुटुंबाच्या १६ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न अखेर फसला आहे. शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष मंगेश अनंत कोळी यांनी दाखल केलेला आक्षेप अर्ज मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आविशकुमार सोनोने यांनी फेटाळून लावला. यामुळे परदेशी कुटुंबातील सर्व १६ मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहणार असून, त्यांना प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम २२ अंतर्गत या मतदारांची नावे यादीतून वगळण्याची मागणी हरकतदाराने केली होती. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हेमांगी कोळी यांच्यामार्फत प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान संबंधित सर्व मतदार नमूद पत्त्यावरच वास्तव्यास असल्याचे उघड झाले. त्यानुसार त्यांची नावे याच मतदारसंघात कायम ठेवावीत, असा अहवाल बीएलओ यांनी प्रशासनाला सादर केला होता.
सुनावणीत मतदारांनी सादर केले भक्कम पुरावे
या संवेदनशील प्रकरणावर २ आणि ३ जून २०२६ रोजी विशेष सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान संबंधित मतदार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपली बाजू मांडली. त्यांनी आवश्यक कायदेशीर कागदपत्रे सादर करत आपण उरण विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीतच राहत असल्याचे पुराव्यांसह स्पष्ट केले.


‘केवळ संशयावरून नाव वगळणे अशक्य’: मतदार नोंदणी अधिकारी
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले की, संबंधित मतदार हे इतरत्र स्थलांतरित झाल्याचे कोणतेही ठोस आणि कायदेशीर पुरावे हरकतदाराला सादर करता आले नाहीत. केवळ संशयाच्या आधारावर किंवा अपुऱ्या माहितीच्या बळावर कायदेशीर मतदारांचे नाव यादीतून वगळणे शक्य नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे.
२० जूनपासून ‘विशेष सखोल मतदार पुनरीक्षण’ कार्यक्रम
प्रशासनाने पुढे स्पष्ट केले की, आगामी २० जून २०२६ पासून मतदारसंघात ‘विशेष सखोल मतदार पुनरीक्षण’ (SIR) कार्यक्रम सुरू होत आहे. या मोहिमेत प्रत्येक मतदाराची पुन्हा सखोल पडताळणी केली जाणार असल्याने, सध्याच्या स्थितीत घाईघाईने कोणाचेही नाव वगळण्याचे कोणतेही ठोस कारण नाही.
प्रशासनाच्या या चोख आणि पारदर्शक निर्णयामुळे परदेशी कुटुंबासह शेवा परिसरातील मतदारांनी समाधान व्यक्त केले असून, सध्या उरण परिसरात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे.
