• Tue. Jun 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निडी गावात हत्याकांड व आत्महत्येने खळबळ; तरुणीचा खून करून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ByEditor

Jun 16, 2026

रायगड । अमुलकुमार जैन
रोहा तालुक्यातील निडी गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, २७ वर्षीय तरुणाने त्याच ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण निडी परिसर हादरला असून, प्राथमिक अंदाजानुसार प्रेमसंबंध आणि त्यातून झालेल्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी गणेश ताडकर (वय २०) असे मृत तरुणीचे नाव असून, रोहित जनार्दन पाटील (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी रात्रीच्या सुमारास हे दोघेही निडी येथील लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांच्या बंद घरात एकत्र होते. रात्रीच्या वेळी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने रोहितने तन्वीचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून निर्घृण खून केला. त्यानंतर, तन्वीचा मृत्यू झाल्याचे पाहून रोहितने त्याच खोलीतील छताच्या पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

मंगळवारी सकाळी हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. ज्या घरात ही घटना घडली, त्या घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे काही काळापूर्वी निधन झाले आहे. सद्यस्थितीत या बंद घराची देखरेख आणि चावी तन्वीच्या आईकडेच असायची, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पुढील तपास करत आहे. या हत्या आणि आत्महत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!