• Tue. Jun 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणच्या नागाव-पिरवाडी किनाऱ्यावर तेलाचे तवंग; सागरी जीवसृष्टी धोक्यात, मच्छीमारांमध्ये संतापाची लाट

ByEditor

Jun 16, 2026

उरण । घन:श्याम कडू
तालुक्यातील प्रसिद्ध नागाव-पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर तेलाचे तवंग पसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्राच्या पाण्यावर आणि किनाऱ्यावरील वाळूवर ऑइलचे काळे थर साचल्याने संपूर्ण उरण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. समुद्रात बेकायदेशीरपणे सोडले जाणारे तेलमिश्रित किंवा रासायनिक सांडपाणी या प्रदूषणाला कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सागरी अन्नसाखळी खिळखिळी; पारंपरिक मच्छीमार संकटात

पाण्यावर पसरलेल्या या ऑइलच्या थरामुळे समुद्रातील मासळी, कोळंबी, खेकडे, शिंपले यांसह सूक्ष्म सागरी जीवांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सूक्ष्म जीव नष्ट झाल्यास संपूर्ण सागरी अन्नसाखळी धोक्यात येऊन त्याचा थेट फटका मत्स्य उत्पादनाला बसणार आहे. आधीच विविध प्रकल्प, वाढत्या जेट्ट्या आणि रासायनिक प्रदूषणामुळे उरणमधील मत्स्यव्यवसाय अंतिम घटका मोजत असताना, आता तेलाच्या प्रदूषणाने स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर पुन्हा एकदा मोठा घाव घातला आहे.

प्रदूषणाचा स्रोत कोणता? यंत्रणांचे ‘मौन’

उरण परिसरामध्ये ओएनजीसी (ONGC), जेएनपीए (JNPA), विविध जेट्ट्या, रासायनिक उद्योग, ऑईल टर्मिनल्स आणि मोठे औद्योगिक प्रकल्प कार्यरत आहेत. यातील कोणत्या प्रकल्पातून हे तेल समुद्रात आले, याचा शोध घेण्याऐवजी प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), मत्स्यव्यवसाय विभाग, पर्यावरण विभाग आणि स्थानिक प्रशासन नेहमीप्रमाणे सुस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमागे प्रदूषण करणाऱ्यांना राजकीय व प्रशासकीय संरक्षण मिळत असल्याची चर्चाही आता उरणकरांमध्ये रंगू लागली आहे.

जनारोग्यालाही मोठा धोका

समुद्रातील हे तेलकट प्रदूषण केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नसून मानवी आरोग्यासाठीही घातक ठरणार आहे. प्रदूषित पाण्यातील मासळी मानवी आहारात आल्यास त्वचारोग, श्वसनाचे विकार, पचनसंस्थेचे आजार यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

उरणकरांचा प्रशासनाला परखड सवाल!

“समुद्र प्रदूषित होत आहे, मासळी मरत आहे, आणि मच्छीमार उद्ध्वस्त होत आहेत; तरीही प्रशासन ढिम्म का? एखादी मोठी पर्यावरणीय आपत्ती घडल्यानंतरच यंत्रणांना जाग येणार का? समुद्र ही कोणाची वैयक्तिक जहागीर नसून भावी पिढीची संपत्ती आहे. दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही तर ‘समुद्र वाचवा’ ही घोषणा केवळ फलकांवरच उरेल.”

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या गंभीर प्रकारानंतर स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे. समुद्राच्या पाण्याचे नमुने तातडीने लॅबमध्ये तपासून प्रदूषणाचा मूळ स्रोत शोधण्यात यावा, जबाबदार कंपन्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उरणकरांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!