• Fri. Jul 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधील बोकडवीरा उड्डाणपूल मृत्यूचा सापळा; अवघ्या पाच वर्षांत दुरवस्था, मोठ्या दुर्घटनेची भीती

ByEditor

Jul 3, 2026

घनःश्याम कडू
​उरण : तालुक्यातील बोकडवीरा येथील ‘एमएसईबी’ (MSEB) वीज निर्मिती प्रकल्पालगत असलेला उड्डाणपूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. अवघ्या पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या पुलाची आज अक्षरशः दुरवस्था झाली असून, हा पूल कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या हा पूल प्रशासनाच्या ‘आधाराच्या’ प्रतीक्षेत उभा असल्याचे चित्र आहे.

​अवजड वाहतुकीचा पूल ठरतोय जीवघेणा

​जेएनपीए (JNPA) बंदराकडे जाणारी कंटेनर वाहतूक सुरळीत राहावी, अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सुटावी आणि नागरिकांची गैरसोय टळावी या उद्देशाने या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, देखभालीअभावी अवघ्या पाच वर्षांतच या पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलावरून दररोज एसटी बस, लहान-मोठी वाहने आणि अवजड कंटेनरची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

​पुलाची सद्यस्थिती

पुलाच्या मध्यभागाला मोठे तडे गेले असून, काही भाग सुमारे एक फूट खाली खचला आहे. पुलाचे दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे (Safety Barriers) तुटल्यामुळे वाहने थेट खाली कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दोन्ही टोकांवर मोठमोठी भगदाडे पडली आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

​’सिडको’च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; जुन्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार?

​द्रोणागिरी नोड परिसरात सिडकोने विकासाच्या नावाखाली अनेक पूल उभारले, मात्र त्यांच्या वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट आणि देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

​यापूर्वी २०२१ मध्ये सेक्टर-१५ (फुंडे गाव) जवळील उरण-जुनाशेवा मार्गावरील बॉक्स कल्व्हर्टचा स्लॅब अचानक कोसळून दीपक कसूरकर या दुचाकीस्वाराचा नाहक बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर सिडकोने सर्व कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्तीच्या निविदा काढल्या होत्या. मात्र, त्यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचे बोकडवीरा पुलाच्या सद्यस्थितीवरून स्पष्ट होत आहे.

नागरिकांचा संतप्त सवाल
“संबंधित विभागाने तातडीने या पुलाची पाहणी करून त्याचे सखोल स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू करावी. एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? आणि तसे झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?”
— स्थानिक नागरिक, उरण

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!