• Fri. Jul 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; पावसाळ्यात काळजी घेण्याचे सर्पमित्रांचे आवाहन

ByEditor

Jul 3, 2026

​अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील डोंगरी येथील रहिवासी इंदुमती नरेंद्र पाटील (वय…) या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. घराच्या अंगणात काम करत असताना त्यांना अतिविषारी ‘मण्यार’ सापाने दंश केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

​डोंगरी गावातील अत्यंत मनमिळाऊ आणि प्रेमळ सुवासिनी म्हणून इंदुमती पाटील परिचित होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डोंगरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार मनोहरशेट भोईर यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाळ्यात वाढला सर्पदंशाचा धोका

​उरण तालुका हा खाडीकिनारी आणि डोंगराळ भागात वसलेला असल्याने पावसाळ्यात येथे सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन सर्पमित्र विवेक केणी यांनी केले आहे.

‘वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थे’तर्फे महत्त्वाच्या सूचना:

  • घाबरू नका: सर्पदंश झाल्यास रुग्णाने किंवा नातेवाईकांनी अजिबात घाबरून न जाता धीर ठेवावा.
  • तातडीने उपचार: कोणतीही अंधश्रद्धा किंवा घरगुती तोडगे न करता रुग्णाला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे.
  • परिसराची स्वच्छता: पावसाळ्यात घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून सापांचा वावर रोखता येईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!