रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे माणगाव पोलीस चक्रावले
सलीम शेख
माणगाव : रक्षाबंधनाच्या दिवशी रेल्वे रुळावर अनोळखी तरुणीचा मृतदेह मिळाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे माणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मौजे आडघर गावच्या हद्दीत दि. ३० ऑगस्ट रोजी रेल्वे रुळावर स्टोन क्र. ३५/२३-३५/२४ च्या दरम्यान दुपारी १.४५ ते २.१५ वा.च्या सुमारास उप ट्रॅकवर नेत्रावती एक्सप्रेस गाडी क्र. १६३४६ ची धडक लागून तरुणीचा मृत्य झाला. सदर घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, पो. शि. राम डोईफोडे, गणेश समेळ, श्री. पोंदे, श्री. उभारे रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर सुरुवातीलाच तरुणीचे बूट आढळून आले. थोड्या अंतरावर अंदाजे वय २५ वर्ष पूर्ण चेहरा विद्रुप झालेला व रेल्वेच्या धडकेने रेल्वे रुळावर पडलेला तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलीसांनी आजूबाजूला शोध घेतला असता पूर्णतः छिन्नविछिन्न अवस्थेत मोबाईल आढळून आला. यावेळी रेल्वे पोलीस प्रतीक मेश्राम, राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.
नेमका हा प्रकार अपघात आहे की आत्महत्या याचा पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन माणगाव पोलीसांनी केले आहे.