नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांची कारवाई
मिलिंद माने
महाड : महाड शहरात अनेक भागात गेली दोन वर्षापासून अवैध जुगार अड्डे बोकाळले आहेत. यातील सुकटगल्ली भागात जुगार अड्ड्यावर आज शहर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत रोख रकमेसह तीन आरोपींना ताब्यात घेतले. गेले कांही दिवसांपासून जुगार अड्ड्यावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.
महाड शहरात मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी व इतर बेकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरू आहेत. याबद्दल नागरिकांमध्ये पोलिसांच्या दुटप्पी वागणुकीच्या निषेधार्थ प्रचंड रोष निर्माण झाला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच हे धंदे तत्काळ बंद करण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. महाड शहरातील बेकायदेशीर धंदेवाल्यांना सध्या चांगलाच चाप बसला होता. परंतु, आजही हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. यातील सुकट गल्ली भागात चोरीछुपे मटका अड्डे सुरू असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आणि त्यानुसार मंगळवार, दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारच्या सुमारास शहरातील सुकटगल्ली भागात बेकायदेशीर सुरू असलेल्या सोरट पद्धतीच्या या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त करून पोलिसांनी मनोज महादेव दाखिनकर, निलेश विलास शिंदे व सुनील संतोष चव्हाण या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ च्या कलम १२अ नुसार कारवाई केली आहे.
महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. परंतु जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्याची कारवाई यापुढे देखील अशीच चालू राहावी अशी मागणी महाड शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.