शेकडो भक्तांनी घेतले पवित्र गंगाजल कलशाचे दर्शन
मिलिंद माने
महाड : भारतातील प्रमुख मंदिरांच्या महाकुंभ मेळाव्यात महाडचे ग्रामदैवत तथा प्रसिद्ध प्राचीन शिवकालीन श्री विरेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व विरेश्वर भक्तांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय मंदिर व्यवस्थापनातर्फे वाराणसी उत्तर प्रदेश येथे दि. २२ ते २४ जुलै दरम्यान देशातील प्रमुख मंदिरांचा महाकुंभ मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देशभरातील एकूण ७५७ मंदिरांची निवड करण्यात आली. यामध्ये महाडच्या प्राचीन शिवकालीन श्री विरेश्वर मंदिराची निवड करण्यात आली आहे. या मेळाव्यात विविध धार्मिक विधी व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान श्री विरेश्वर मंदिर विश्वस्तांनी वाराणसी ललितघाट येथे गंगामातेची महाआरती करून गंगामाई जलाभिषेक व दर्शनाचा लाभ घेतला आणि तेथील पवित्र गंगाजल कलश महाड येथे भाविकांच्या दर्शनासाठी आणले आहे.
सोमवार, दि. २८ऑगस्ट २०२३ रोजी या पवित्र जलकुंभाचे विधिवत पूजन करून तो भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने “काशी विश्वनाथचे वाराणसी महात्म्य” या विषयावर पाली येथील रायगड भूषण पुरस्कार प्राप्त हभप धनंजय सुभाष गद्रे महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो भक्तांनी गंगाजल कलश दर्शन व सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला. या भक्तीमय कीर्तनास हार्मोनियमवर रविंद्र मालगुंडकर तर तबल्यावर सिद्धेश जोशी यांनी सुरेल साथ दिली. याप्रसंगी विरेश्वर देवस्थान कमिटीतर्फे सरपंच दीपक वारंगे,उपसरपंच रमेश नातेकर, पंच दिलीप पार्टे, अनंत शेट, वसंत गोगावले, संजय पवार, गणेश वडके, त्याचप्रमाणे सुभाष शिंदे, शिलीमकर सर, बाबू पारधी, गजानन काप व शेकडो विरेश्वर भक्त उपस्थित होते.