• Thu. Apr 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिशिर धारकर यांच्या सेना प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भगवा फडकणार!

ByEditor

Aug 31, 2023

मिलिंद माने
मुंबई :
रायगड जिल्ह्यातील 191 पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकण्यास शिशिर धारकर यांचा पक्षप्रवेश कारणीभूत ठरणार असून शेकाप, काँग्रेस यांच्या मदतीने आमदार होण्याचा धारकर यांचा मार्ग सुकर झाला असून भाजपाच्या रवीशेठ पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभा मतदार संघावर शेकापक्षाचे वर्चस्व होते. 2009 पूर्वी रवीशेठ पाटील यांनी काँग्रेस पक्षातून विजय संपादित केला होता. त्यानंतर सलग 2009 व 2014 या दोन विधानसभा निवडणुकीत सलग शेकाप पक्षाच्या धैर्यशील पाटील यांनी विजय संपादित केला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले रवीशेठ पाटील यांनी धैर्यशील पाटील यांचा पराभव केला. मात्र, शिवसेनेला आजपर्यंत या मतदारसंघात विजय संपादित करता आला नव्हता मात्र आज शिशिर धारकरांच्या रूपाने शिवसेनेला विजय प्राप्त करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशी परिस्थिती सध्या तरी या मतदारसंघात दिसत आहे.

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नागोठणे येथील किशोरशेठ जैन यांनी 44 हजार 251 मते घेतली मात्र, त्यांना यश काही संपादित करता आले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले शिशिर धारकर यांचा पूर्व इतिहास पाहता त्यांचे वडील आप्पासाहेब धारकर हे काँग्रेसच्या काळात राज्यमंत्री होते. 1980 ,1986 व 1990 ते 1996 या काळात ते विधान परिषद सदस्य होते. राज्यमंत्रीपद भूषवले असताना ते रायगड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री देखील होते. शिशिर धारकर हे पेण अर्बन बँकेतील घोटाळ्यातील मुख्य आरोपी असले तरी तरी त्यांच्याकडे जवळपास 50 हजाराचे स्वतःचे मताधिक्य कायम आहे. याच मताधिक्याच्या जोरावर व शिवसेनेची मते व महाविकास आघाडी म्हणून एकत्र आल्यास काँग्रेसची मते व शेतकरी कामगार पक्षाची ताकद या सर्व मतांच्या बेरजेच्या राजकारणात शिशिर धारकर यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर ठरू शकतो.

191 पेण विधानसभा मतदारसंघात शिशिर धारकर यांचे पेण अर्बन बँकेतील घोटाळ्यात मुख्य सहभाग असला तरी अनेक लोकांचे संसार मात्र त्यांनी जगवण्याचे काम केल्याची चर्चा पेण विधानसभा मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे. त्या जोरावरती ते विधानसभा मतदारसंघात भाजपाशी लढत देऊ शकतील. शिवसेनेच्या जोडीला काँग्रेस ,शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहुजन आघाडी सोबत राहिल्यास भाजपा उमेदवारला ही निवडणूक मोठी अडचणीची ठरू शकते किंबहुना या मतदारसंघात निवडणूक लढताना रवीशेठ पाटील यांना उमेदवारी देणार की वयोमानानुसार त्यांचे पुत्र वैकुंठशेठ पाटील यांना उमेदवारी देणार की शेतकरी कामगार पक्षातून भाजपात गेलेले धैर्यशील पाटील यांना अथवा त्यांची पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नीलिमा पाटील यांना उमेदवारी मिळणार? यामुळे भाजपा पक्षात पेण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भविष्यात फुटीची बिजे रोवली जाऊ शकतात.

सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पेण मतदार संघातील उमेदवारांना पडलेल्या मतांची आकडेवारी

  • धैर्यशील मोहन पाटील (शेतकरी कामगार पक्ष) 60757
  • रवीशेठ दगडू पाटील (काँग्रेस) 53141
  • अनिल दत्तात्रय तटकरे (अपक्ष) 49,992
  • हरिश्चंद्र भागुराम बेकवडे (अपक्ष) 4,642
  • रवींद्र बाळाराम पाटील (अपक्ष) 1,452
  • विजय केशव पाटील (अपक्ष) 1,451
  • भिकू सिताराम राऊत (बहुजन समाज पार्टी) 1,437
  • मोहन रामचंद्र पाटील (अपक्ष) 1,274
  • रवींद्र मारुती पाटील (अपक्ष) 1,236
  • संदीप पांडुरंग पारते (अपक्ष) 948
  • बल्लाळ गोविंद पुराणिक (अपक्ष) 896
  • रवींद्र रामचंद्र पाटील (अपक्ष) 499

सन 2014 च्या निवडणुकीत पेण विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी:
पुरुष मतदार : 1,44,018
स्त्री मतदार : 1,38,523
एकूण मतदार : 2,82,621

  • धैर्यशील मोहन पाटील (शेतकरी कामगार पक्ष) 64,616
  • रवीशेठ पाटील (काँग्रेस) 60,496
  • किशोर ओटरमल जैन (शिवसेना) 44,251
  • संजय जांभळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 11,387
  • रामशेठ घरत (भारतीय जनता पार्टी) 9,452
  • एकूण मतदानाची टक्केवारी 71.67
  • नोटा 2,888

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पेण मतदार संघात संभाव्य उमेदवारांना पडलेल्या मतांची आकडेवारी:

  • रवीशेठ पाटील (भारतीय जनता पार्टी) 1,12,380 – 52 टक्के
  • धैर्यशील मोहन पाटील (शेतकरी कामगार पक्ष) 88 हजार 329 – 40.91 टक्के
  • नंदा राजेंद्र म्हात्रे (काँग्रेस पक्ष) 2,330 – 1.08 टक्के
  • रवी पाटील (अपक्ष) 1551 – 0.72 टक्के
  • रमेश मंगळ्या घरत (अपक्ष) 1556 – 0.72 टक्के
  • रमेश गुरु पवार( वंचित बहुजन आघाडी) 1413 – 0.65 टक्के
  • मोहन रामचंद्र पाटील (अपक्ष) 1279 – 0.59 टक्के
  • धनराज लक्ष्मण खैरे (बळीराजा पार्टी) 1235 – 0.57 टक्के
  • रवी पाटील (अपक्ष ) ८९७ – ०.४२ टक्के
  • बाळाराम शंकर गायकवाड (बहुजन समाज पार्टी) 736 – 0.34 टक्के
  • रोहिदास गोविंद गायकवाड (अपक्ष) ६९९ – ०.३२ टक्के
  • सुनिता गणेश पवार (अपक्ष) २५१ – ०.१२ टक्के
  • संदीप भाई पांडुरंग पार्टी (बहुजन महाराष्ट्र पार्टी) २२६ – 0.10 टक्के

शिवसेनेच्या तीन आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना उध्दव ठाकरे गटाची अवस्था जिल्ह्यात फारशी बरी नसताना पेण विधानसभा मतदार संघात मात्र शिंदे गट फारसा प्रभाव पाडताना दिसत नाही. एकंदरीत पेण विधानसभा मतदारसंघातील मागील तीन निवडणुकीची आकडेवारी बघितल्यास सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र राहिल्यास शिवसेनेचे शिशिर धारकर यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.

पेण विधानसभा मतदारसंघात आगरी कोळी या समाजाबरोबरच कुणबी समाज, सुधागड, रोहा व पेण तालुक्यातील आदिवासी ठाकूर समाजाचे प्राबल्य देखील मोठ्या प्रमाणावर आहे. हा समाज शेतकरी कामगार पक्षाबरोबरच शिवसेनेकडे देखील मोठ्या प्रमाणावर आहे. याचाच फायदा शिशिर धारकर यांना होण्याची शक्यता पेण विधानसभा मतदारसंघात मोठी असून आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला विजय संपादित करता आला नव्हता, धारकरांच्या रूपाने पेण विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकण्याची दाट शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!