घनःश्याम कडू
उरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील ऊर्फ भाऊ यांच्या प्रथम स्मृतिदिनी उरणवासीयांच्या भावना उचंबळून आल्या. जेएनपीटी मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केलेल्या आदरांजली कार्यक्रमात भाऊंच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले, तर अंतःकरणात अस्वस्थता पुन्हा जागी झाली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वर्षश्राद्ध विधीने झाली. प्रवीण पाटील व कुटुंबीयांनी विधीवत पूजा केली. भावनांनी भरलेल्या वातावरणात आईच्या आणि भावंडांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले — जणू त्या आक्रमक नेत्यानं आपल्या घराच्या मुळावरच घाव घातला होता. भजनाच्या सुमधुर स्वरांनी वातावरण भारून टाकलं आणि आठवणींनी सर्वांच्या मनात कालपरत्वे निर्माण झालेली पोकळी पुन्हा जाणवू लागली. ट्रस्टी दिनेश पाटील म्हणाले, “आजही त्यांच्या फोटोसमोर उभं राहिलो की वाटतं भाऊ आपल्या शेजारीच आहेत. त्यांनी समाजासाठी अनेकदा निस्वार्थ लढे दिले. पण अशी एक्झिट? अजूनही विश्वास बसत नाही.”

२० जून २०२४ ला त्यांच्या आकस्मिक निधनानं उरण व परिसर स्तब्ध झाला होता. त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वाचं तेज आजही उरणच्या रक्तात वाहतंय, आणि त्यांची पोकळी भरून काढणं अशक्य असल्याचं पुनः अधोरेखित झालं आहे.
कार्यक्रमास माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे,हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, माजी जि.प. सदस्य विजय भोईर, माजी पंस सदस्य दीपक ठाकूर, माजी चिटणीस विकास नाईक, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव संतोष पवार, तसेच जयवंत पाटील, नरेंद्र भगत, मनोहर ठाकूर, किशोर ठाकूर, पुखराज सुथार, परीक्षित ठाकूर, मनोज भगत, जेएनपीटी ट्रस्टी रवी पाटील, समीर सुर्वे आणि इतर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.