मिलिंद माने
महाड : शहरातील एम. जी. रोडवरील हॉटेल मेजवानीच्या जागेसंदर्भातील जुन्या वादातून एका जोडप्यास मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ आणि अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १९ जून २०२५ रोजी दुपारी २:१५ वाजता हॉटेल मेजवानी किचनमध्ये घडली. प्रथमेश विजय जाधव (रा. डोंगरीपूल, एम.जी. रोड, महाड) यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तक्रारीनुसार वादग्रस्त जागेच्या मुद्द्यावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांनी जातिवाचक शब्दप्रयोग व अश्लील वर्तनही केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार प्रसाद रामकृष्ण जाधव, पूजा प्रसाद जाधव, दर्शन प्रसाद जाधव, यश प्रसाद जाधव, रोशनी यश जाधव, निर्मला सावंत, साहिल सावंत आणि प्रवीण सावंत (सर्व रा. काकरतळे, महाड) या आठ जणांविरोधात संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस करत आहेत.