मिलिंद माने
महाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. आत्ता दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे बहुतांशी काम पूर्ण होत आले होते. मात्र, पुलाचा जुना पिलर नवीन स्लॅबच्या बांधकामाला अडथळा ठरत होता तो तोडत असताना पुलाच्या स्लॅबचे लोखंडी अँगल सरकले व ते पाण्यात कोसळल्याने 15 सप्टेंबरपासून चालू होणाऱ्या आंबेत पुलावरील वाहतूक चालू होण्यास आता आणखी काही काळ लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माणगाव येथील उपविभागीय अभियंता श्रीकांत गणगणे यांनी सांगितले.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत पूल हा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु, ऑक्टोबर 2021 मध्ये आंबेत पुलाची पाण्याखालून तपासणी करण्यात आली होती त्यावेळी पुलाचा भाग सुस्थितीत असल्याने पुलाच्या वरील भागाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये हा पूल धोकादायक बनल्याने त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणात पुलाचा पाया क्रमांक पाच झुकल्याचे स्पष्ट झाल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.
आंबेत पुलाचा पिलर भरती व ओहोटीच्या वेळी दोन ते चार मीटरने हलत असल्याचे यांत्रिक साधनाद्वारे दिसून आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हा पूल वाहतुकीसाठी बंद केला व त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 15 फेब्रुवारी 2022 रोजी या पुलाच्या संदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला रायगडचे खासदार सुनील तटकरे, तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता आदी या बैठकीला उपस्थित होते.

त्यावेळेलाआंबेत पूल बंद असल्याने दोन्ही जिल्ह्यातील रहिवाशांची व प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या ठिकाणी रोरो सेवा सुरू करण्याचे निश्चित केले व आंबेत पुलाजवळून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन्ही बाजूकडे रो-रो सेवा चालू करण्यात आली. आंबेत पुलामुळे रायगड व रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे जोडण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या काळात झाले होते. या पुलावरून रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवरील असणाऱ्या गावांना आंबेत पूल हा महत्त्वाचा दुवा आहे.
आंबेत पुलाच्या डागडुजीसाठी 14 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, या पुलाचे काम करणाऱ्या पिलानी इन्फॉ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 15 सप्टेंबर अर्थात इंजिनिअर डे दिनी पूल चालू करण्याचे प्रयोजन ठरले होते. कोकणात गणेश उत्सव हा महत्त्वाचा उत्सव असून यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण व गुजरातहून हजारो चाकरमानी हे गणेशोत्सवाच्या काळात आठवडाभर अगोदर आपापल्या गावी दाखल होतात. मात्र, 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी म्हणजे 15 सप्टेंबरपासून हा पूल चालू करण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माणगाव येथील उपविभागीय अभियंत्यांकडून सुरु होते. मात्र, अचानकपणे पुलाचा जुना कॉलम तोडायचे काम चालू असताना नवीन कामाचा काही भाग कोसळला मात्र पुलाचा पूर्ण स्लॅप कोसळल्याची जी आवई उठवली जाते ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे माणगाव येथील उपविभागीय अभियंता श्रीकांत गणगणे यांनी सांगितले.
आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम बहुतांशी पूर्णत्वाकडे चालले असून 15 सप्टेंबरपर्यंत या पुलावरून पूर्वीसारखीच वाहतूक चालू होण्याची शक्यता असताना आता मात्र पुलावरील नवीन स्लॅब टाकल्यानंतर त्याची पूर्णपणे तज्ज्ञांमार्फत चाचणी करून व वरिष्ठांच्या आदेशानंतरच पुलावरून वाहतूक चालू केली जाईल. त्याला काही काळ लागेल. परंतु, निश्चित तारीख आज मात्र सांगता येणार नाही असे माणगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्रीकांत गणगणे यांनी सांगितले.