• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

इंदापूर येथे प्रेमसंबंधावरून पत्नीची हत्या करून प्रेत टाकले नदीकिनारी; आरोपी पतीला अटक

ByEditor

Sep 2, 2023

सलीम शेख
माणगाव :
दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. सदरील घटना माणगाव तालुक्यातील इंदापूर गावच्या हद्दीत गोड नदीवरील रेल्वे पुलावरील सिमेंट स्टोन कॉलम नं. १०४ येथे शुक्रवार, दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार सूर्यकांत शिवराम मगर (वय -५७) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील आरोपी गणेश रमेश चव्हाण (वय -३६) रा. इंदापूर ता. माणगाव याने त्यांची मयत पत्नी शारदा गणेश चव्हाण (वय -३५) रा. इंदापूर ता. माणगाव हीचे दुसऱ्या माणसाबरोबर प्रेमसंबंध आहेत असे समजल्यावर त्या रागात आरोपी पतीने मयत पत्नी शारदा चव्हाण हिच्या हात, पाय व छातीवर काठीने मारून तिला गंभीर दुखापत करून नंतर तिचे डोके रेल्वे सिमेंट स्टोन कॉलम नं. १०४ वर आपटून गंभीर दुखापत करून तिची हत्या केली. यानंतर तिचे प्रेत नदी किनारी टाकून दिले व पहिली पत्नी शेवंता वाघमारे व तिच्या नातेवाईकांनी तिची हत्या केली अशी १०० नंबरला खोटी माहिती देऊन माणगाव पोलीस ठाण्यास प्राप्त डायल ११२ नंबरवर पोलीस कंट्रोल रूमला खोटी माहिती दिली. या घटनेची माहिती समजताच माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कुमार पोंदकुळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सपोनी एस. अस्वर, पोलीस उपनिरीक्षक श्री. भोजकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात काँ. गून्हा. रजि. नं. २८४/२०२३ भादवी संहिता कलम ३०२, १७७ अन्वये करण्यात येऊन आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!