किरण लाड
नागोठणे : येथील अशफाक महामूद पानसरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या अंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्हा काॅंग्रेस औद्योगिक सेलच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. तसे नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष डाॅ. हेमंत सोनारे यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेलचे सचिव आनंद कुलकर्णी तसेच रायगड जिल्हा काॅंग्रेस औद्योगिक सेलचे अध्यक्ष अशोक मोकल, माजी पंचायत समिती सदस्य बिलाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
अशफाक पानसरे हे प्रसिद्ध उद्योजक असून ते नागोठणे शहर काॅंग्रेसचे विद्यामान अध्यक्ष आहेत. नागोठणे शहर व विभागात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत. वडील महामूदशेठ पानसरे व भाऊ शब्बीरशेठ पानसरे यांनी आखुन दिलेल्या सामाजिक कार्याबरोबर जातीय सलोखा राखुन विभागात शांतता कशी राहील यासाठी नेहमी कार्यरत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांची रायगड जिल्हा शांतता कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती केलेली आहे. हिंदु-मुस्लिम समाजामध्ये लोकप्रिय असलेले अशफाक पानसरे यांच्या नियुक्तीने नागोठणे तसेच विभागातील जनतेने आनंद व्यक्त केला आहे.