अमूलकुमार जैन
अलिबाग : खोपोली बाजारपेठ येथे गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या पुनम जितेश सकट, सुनिता अशोक राखपसरे (दोन्ही रा. घुले वस्ती, महादेव नगर, मांजरी, जि. पुणे) या दोघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७ हजार ८०० रुपयांसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ३१ ऑगस्ट 2023 रोजी अपर्णा संदीप पाटील व शीतल नितीन चांदोरकर या दोन महिला खोपोली बाजारपेठेमध्ये वेगवेगळया ठिकाणी रस्त्यावर विक्री करीत होत्या. बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन दोन अनोळखी आरोपीत महिलांनी विक्री करीत असलेल्या महिलांच्या पर्समधील अनुक्रमे 3,800/- रुपये व 4,000/- असे एकूण 7,800/- रुपये रोख रक्कम, मुळ आधारकार्ड, बँकांचे एटीएम कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्रे असा मुद्देमाल चोरुन नेला होता.
याबाबत अपर्णा संदीप पाटील व शीतल नितीन चांदोरकर या महिलांनी खोपोली पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. घडलेल्या गुन्ह्याची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार महिला पोलीस नाईक पी. एस. कांबळे, बिट मार्शल पोलीस शिपाई अमोल राठोड व पोलीस शिपाई राजेश चौहान यांनी शितल राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरीत तपास करुन वेगवान हालचाली केल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या २ महिला आरोपित महिला पुनम जितेश सकट, सुनिता अशोक राखपसरे (दोन्ही रा. घुले वस्ती, महादेव नगर, मांजरी, जि. पुणे) यांना रंगेहाथ पकडण्यात खोपोली पोलीसांना यश आले आहे.
सदर बाबत २ आरोपित महिलांविरुध्द खोपोली पोलीस ठाणे कॉ.गु.र.नं.277/2023, भा.द.वि.सं.क.379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार दिव्या देशमुख या करित आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूर विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, महिला पोलीस नाईक पी. एस. कांबळे, पोलीस शिपाई अमोल राठोड, पोलीस शिपाई राजेश चौहान यांनी केली आहे.