जुन्या इन्स्पेक्शन गॅलरीचा भाग कोसळविला; नवीन कामाला कोणताच धक्का नाही
गणेश प्रभाळे
दिघी : कोकणातील रत्नागिरी रायगड जिल्हे जोडणारा म्हाप्रळ आंबेत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, गुरुवारी सायंकाळी पूल कोसळल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच एकच खळबळ उडाली.
आंबेत पूल कोसळला म्हणून सोशल मीडियावर दोन दिवसापासून अफवा पसरत आहे. जुन्या पिलरचा काही भाग कोसळण्याच्या आवाजामुळे परिसरात देखील एकच घबराट उडाली होती. या विषयी समाजमाध्यमांत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने वास्तवात या घटनेची माहिती घेण्यात आली. दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव यांच्या माध्यमातून सुरू आहे. सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामात तयार करण्यात आलेली इन्स्पेक्शन गॅलरी गुरुवारी रात्री अचानक कोसळली. मात्र, या गॅलरीचा कोणताच धोका नवीन कामाला झाला नसल्याची माहिती समोर आली.

या कामामध्ये वापरण्यात येणाऱ्या बेअरिंग लावण्यात आल्यानंतर या बेअरिंगची पाहणी करण्यासाठी ही गॅलरी तयार करण्यात आली होती. पुलाच्या सुरू असलेल्या स्लॅबच्या कामात या कोसळलेल्या भागामुळे कोणतीच बाधा अथवा अडचण निर्माण झाली नसल्याची बांधकाम विभागाकडून माहिती देण्यात आली.
जुन्या P5 पिअर्सच्या स्लॅब व आर्टिक्युलेशन भाग पूर्वी आवश्यकते एवढा तोडण्यात आलेला होता. नवीन गर्डर्सचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना जुन्या तोडलेल्या पिअर P5 चे म्हाप्रळ बाजूकडील आर्टिक्युलेशन तुटून पडले. सदर तुटून पडलेल्या भागामुळे नवीन बाांधकामास कोणतीच हानी पोहचली नाही.
-श्रीकांत गणगणे,
सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी