श्रीवर्धन तालुक्यातील मंदीर व्यवस्थापनसाठी हरिहरेश्वर येथे मार्गदर्शन
गणेश प्रभाळे
दिघी : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे श्रीवर्धन तालुक्यातील मंदिरांची प्राथमिक स्वरूपात ओळख व्हावी याकरिता ‘सुरुवात मंदिर पर्वाची संमेलन २०२३’ हे संमेलन उत्साहात संपन्न झाले. श्री हरिहरेश्वर काळभैरव मंदिर संस्थानकडून शनिवारी (ता. 1) झालेल्या या संमेलनात तालुक्यातील सर्व मंदिर व्यवस्थापक सहभागी झाले होते.
या संमेलनाला रायगड जिल्ह्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रताप सातव हे प्रमुख विशेष अतिथी होते तर बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, महड येथील गणपती देवस्थानचे सिद्धार्थ जोशी,आधुनिक तंत्रज्ञान- मकरंद गोलटकर, रेवदंडा येथील ह. भ. प. संदिप बुवा केळकर, कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, हरिहरेश्वर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोलथरकर यांनी मार्गदर्शन केले.
या संमेलनात मंदिरांचे संघटन करणे, त्यांना नोंदणीकृत करण्यासाठी येणाऱ्या समस्या याबाबत मार्गदर्शन व चर्चा करणे, शिस्तबद्ध व्यवस्थापन करणेबाबत मार्गदर्शन, मंदिरांची सुरक्षा व्यवस्था याबाबत मार्गदर्शन, व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी, तीर्थाटन धार्मिक पर्यटन याबाबत मार्गदर्शन, स्वच्छता व्यवस्थापन, आणि सर्वात महत्त्वाचे सार्वजनिक मंदिरांचे सामाजिक जीवनातील महत्व अश्या विशेष मुद्द्यांवर चर्चा झाली. संमेलनाची प्रथम संकल्पना श्री देव हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थान सचिव व खजिनदार सिद्धेश पोवार यांनी मांडली व संस्थेचे अध्यक्ष वामन बोडस, विश्वस्त निनाद गुरव यांच्यासह सर्व विश्वस्तांनी होकार दिला.
सरपंच अमित खोत, माजी सरपंच राजेश शेट्ये, जेष्ठ महिला सेवेकरी व प्रथम महिला सरपंच सुनंदा लांगी तसेच हरिहरेश्वर मधील एचकेसीसी या क्लबचे अध्यक्ष अभिजित धमणस्कर, उपाध्यक्ष भूपेंद्र जावकर, सेक्रेटरी अनिरुद्ध गुरव आणि ग्रुपचे सर्वच सभासद, शिवाजीनगर, भेंडखोल, आगर भागातील तरुण मंडळी यांनी संमेलनात मोलाचे सहकार्य केले.