सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील पोटणेर गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला उभा असलेल्या आयशर कंपनीच्या टेम्पोला एसटी बसची पाठीमागून जोरात धडक लागून झालेल्या अपघातात आयशर चालक जखमी झाला. सदरील अपघात शनिवार, दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद संतोष राजाराम गोळे (वय-४७) रा. ता. पोलादपूर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, यांतील आरोपी एसटी बस चालक अनिलकुमार राजकुमार हेळवी (वय-३३) रा. माद्रूप जि. सोलापूर याने त्याच्या ताब्यातील एसटी बस क्र .एम. एच. २०बी. एल. ३३१६ हि गाडी महाड ते पनवेल अशी अतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवीत घेऊन जात असताना त्याची गाडी माणगावजवळील पोटणेर गावच्या हद्दीत आली असता भारत पेट्रोल पँपासमोर मुंबई- गोवा महामार्गावर ट्रान्स्पोर्टची आयशर १११० कंपनीचा टेम्पो क्र. एम. एच. ०५ ए. एम. २९६३ हि गाडी बिघडल्यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी करून त्यावरील चालक रंजितकुमार अच्छेलाल निशाद याने गाडीतून उतरून गाडीमध्ये काय बिघाड झाला आहे हे बघण्याकरिता गाडीच्या खाली जाऊन पाहत असताना एसटीची या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरात धडक लागून अपघात घडला. या अपघातात आयशर टेम्पो चालक रंजितकुमार अच्छेलाल निशाद (वय-३०) सध्या रा. महाड जि. रायगड मूळ रा. सुजानगंज राज्य उत्तरप्रदेश हा जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. २८५/२०२३ भादंवि संहिता कलम २७९, ३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक फडताडे करीत आहेत.