• नागोठणे रेल्वेस्टेशनवर थांबा नाही; थांबा पाहिजे प्रवाशांची मागणी
• रोहा-पनवेल शटल सुरु करावी; लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
किरण लाड
नागोठणे : गणेशोत्सव हा सर्वांचा आवडता सण. विशेषतः कोकणवासीयांचा जास्त मुंबई तसेच परगावी कामानिमित्त असणारा चाकरमणी आपल्या साहेबाला सांगतो “साहेब मला गणपतीला सुट्टी पाहिजे, नाही दिलीत तर नोकरी सोडेन…पण गणपतीला गावी जाईन. एवढी श्रध्दा, प्रेम बाप्पावर असणाऱ्या कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव काळात रेल्वेने 156 स्पेशल ट्रेन सोडल्या आहेत. पण त्यातील एकही ट्रेनला कोकणविभागात मोडणाऱ्या नागोठणे रेल्वेस्थानकात थांबत नाही. याचे आश्चर्य प्रवाशी वर्गातून व्यक्त केले जात आहे.
नागोठणे हे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. रिलायन्स इंडस्ट्रीज, सुप्रीम पेट्रोकेम, जिंदाल कंपनी या सारखे मोठ मोठे कारखाने, त्यात काम करणारे स्थानिक, तसेच परप्रांतीय कामगार, राष्ट्रीय महामार्ग, शाळा, महाविद्यालये, आयटीआय काॅलेज यासारखे शिक्षणाचे हब नागोठणे विभागात आहेत. त्यात शिक्षण घेणारे गावातील तसेच परगावांतील विद्यार्थी, कारखान्यावर आधारीत उभे झालेले व्यवसाय, त्यांचे कामगार, मुंबई शहराकडे कामानिमित्त ये-जा करणारे चाकरमानी या सर्वांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी, गावाकडे जाण्यासाठी, रुग्णांना मोठमोठ्या,सरकारी, खाजगी हाॅस्पिटलमध्ये मूंबईला उपचारासाठी, मंत्रालयात तसेच इतर सरकारी कार्यालयात कामानिमित्त जाण्यासाठी सर्वात जलद, सुखकारक प्रवासासाठी सुलभ असेल तर ती रेल्वे. मुंबई-गोवा महामार्ग प्रवासासाठी खडतर बनल्याने जनतेचा, प्रवशांचा रेल्वेवर जास्त विश्वास निर्माण झालेला आहे. पूर्वी कोकण रेल्वेसाठी आपटा ते रोहा भागातील शेतकऱ्यांच्या जागा संपादीत केल्या आहेत. तसे दाखले भूसंपादनाचे येथील प्रकल्पग्रस्तांना दिले आहेत. नंतर सरकारने घुमजाव करुन आपटा ते नागोठणेपर्यंत रेल्वे मार्गावर येणारी सर्व गावे मध्य रेल्वेकडे वर्ग केले आहेत आणि रोह्यापासून पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतची रेल्वे मार्गावरील गावे कोकण रेल्वे म्हणुन संबोधली जातील. एकप्रकारे आपटा ते रोह्यापर्यंत जनतेवर सरकारने तसेच रेल्वे विभागाने अन्याय केलेला आहे. कोकणचे भाग्यविधाते माजी खासदार प्रा. मधु दंडवते यांनी कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वे आणली. त्या हेतुची व उद्दिष्टांची कोठेतरी पायमल्ली झाल्यासारखी आज तरी दिसत आहे.
रेल्वे सुरु झाल्यापासून रोहा-नागोठणे, पनवेल, दिवा, मुंबईकडे जाणाऱ्या तसेच येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सकाळी 5.30 वाजता रोहा-पनवेल- दिवा, सकाळी 7.00 वाजता रोहा-पनवेल-दिवा, सकाळी 11.15 वाजता रत्नागिरी-रोहा-दिवा, तसेच संध्याकाळी 4.30 वाजता रोहा-पनवेल-दिवा या मुंबई बाजुकडे जाणाऱ्या रेल्वे नागोठणे रेल्वेस्टेशनवर थांबतात. मुंबई बाजुकडून नागोठणेकडे येणाऱ्या गाड्या सकाळी 10.39 दिवा-रोहा, रात्री 7.44 दिवा-रोहा-रत्नागिरी, रात्री 8.55 दिवा-रोहा, रात्री 10.00 वाजता दिवा-रोहा ह्या रेल्वे नागोठणे रेल्वे स्थानकावर थांबतात. सन 1966 साली दिवा-पनवेल रेल्वे सेवा सुरु झाली. त्यानंतर आपटा ते रोहा रेल्वे मार्गासाठी सन 1967 साली जागा संपादित केल्या गेल्या. तोच रेल्वे मार्ग रोह्यापर्यंत सन 1986 मध्ये वाढविला गेला. आतापर्यंत या मार्गावरील दिवसभरात जाणाऱ्या दोन तसेच येणाऱ्या दोन या गाड्या नागोठणे रेल्वेस्टेशनवर ये-जा करीत होत्या. त्यात फक्त येत्या 75 वर्षात दोन येणाऱ्या तसेच दोन जाणाऱ्या रेल्वेची भर पडली आहे. या मार्गावरुन आजमितीस अनेक रेल्वे गाड्या परराज्याकडे धावतात. त्यांच्या जाण्यायेण्या वेळी लोकल रेल्वेला थांबावे लागते. त्याचा नाहक त्रास येथील प्रवाशांना होत आहे. येथील प्रवाशांनी तसेच संघटनांनी नागोठण्यासाठी दर एक तासानी लोकल गाड्या सुरु कराव्यात तसेच महत्वाच्या काही जलद गाड्या नागोठणे रेल्वे स्थानकावर थांबवाव्यात यासाठी गेली अनेक वर्षे रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडे निवेदन, विनंती अर्ज दिलेले आहेत. परंतु, आजही परिस्थिती जैसे थै आहे.
आता गौरी-गणपतीचा सण जवळ आलेला आहे. कोकणांतील चाकरमान्यांसाठी नियमित रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त 156 स्पेशल ट्रेन गणपती उत्सवासाठी सोडल्या आहेत. त्यातील किमान एक, दोन तरी ट्रेनला नागोठणे रेल्वेस्टेशनवर थांबा मिळावा यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी माफक अपेक्षा प्रवाशांनी तसेच रेल्वे प्रवाशी संघटनांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवासाठी 156 स्पेशल ट्रेन
१) मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशल (40 सेवा)
सावंतवाडी ते मुंबई या गाडीला रायगड जिल्हयातील फक्त पनवेल, माणगाव रेल्वे थांबा दिलेला आहे.
२) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस (24 सेवा)
या गाडीचे जिल्ह्यातील पनवेल, रोहा,माणगाव ह्या स्टेशनवर थांबणार आहे.
३) पूणे-करमाळी/कुडाळ-पूणे विशेष (6सेवा)
थांबा फक्त पनवेल, माणगाव.
४) करमाळी-पनवेळ-कुडाळ विशेष (साप्ताहिक) 6 सेवा
थांबा फक्त रोहा व माणगाव.
५) दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल (40 सेवा)
थांबा फक्त रोहा, माणगाव.
६) मुंबई-मडगाव विशेष साप्ताहिक (40 सेवा)
थांबा फक्त पनवेल,रोहा,माणगाव
या स्पेशल 156 ट्रेन कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव काळात रेल्वेने चालु केलेल्या आहेत. यामध्ये नागोठणे, पेण स्थानकाला थांबा दिलेला नाही. पनवेलकडून कोकणात तसेच परराज्याकडे रोजच्या रोज अनेक रेल्वे जा-ये करीत असतात. तसेच लाखो प्रवाशी रोज या मार्गावरुन प्रवास करीत असतात. आता त्यामध्ये गणेशोत्सवाच्या स्पेशल ट्रेनची भर पडलेली आहे. पण नागोठणे, पेण विभागातुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनचा फायदा तर नाही, परंतु जलद गाड्यांना लवकर मार्ग देण्यासाठी लोकल गाड्या कधीकधी एक ते दोन तास थांबबाव्या लागतात. सणासुदीला रेल्वेचा प्रवास सुखदायक न होता त्रासदायक होऊ लागला आहे. या मार्गावरुन ये जा करणाऱ्या अनेक जलद गाड्या रेल्वे खात्याला उत्पन्न मिळुन देत असल्या तरी, त्यातल्या काही जलद गाड्या किंवा किमान गणेशोत्सवात चालू केलेल्या स्पेशल गाड्या तरी नागोठणे व पेण या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवाव्यात किंवा रोहा-पनवेल शटल वाढवावी यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत अशी मागणी या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांची आहे.