प्रतिनिधी
रायगड : शिक्षण क्षेत्रात आपले भरीव योगदान देणाऱ्या चालू सेवेतील आणि निवृत्त शिक्षकांचा सन्मान साहित्यसंपदातर्फे “शिक्षक रत्न” पुरस्काराने करण्यात येतो. यंदा २०२३ सालचा शिक्षक रत्न पुरस्कार पेण-रायगड येथील डॉ. अनुपमा दिलीप धनावडे यांना शिक्षक दिनाचे औचित्यसाधून जाहीर करण्यात आला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेत डॉ. अनुपमा धनावडे ह्यांनी एम.फिल, पीएच.डी.पर्यंत मजल मारली. मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या रायगडमधील डॉक्टरेट मिळविण्याचा पहिला बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. पीएच.डी.साठी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विषयातील विद्यार्थ्यांना अजूनही त्यांचे मार्गदर्शन लाभते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील काही विद्यार्थ्यांनी हिंदी विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. स्वामी विवेकानंद संस्थेचे पतंगराव कदम आर्टस् आणि कॉमर्स कॉलेज पेण येथे त्यांनी प्राचार्य म्हणून कार्यभाग सांभाळला होता. सखोल मार्गदर्शक, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख सर्व विद्यार्थ्यांना आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी प्रत्यक्षरित्या, अप्रत्यक्षरित्या वेळोवेळी मदत केली आहे. त्यांनी शिकवलेले अनेक विद्यार्थी आज समाजात उच्च पदावर कार्यरत आहेत.
आपल्या यशामागे आपले पती दिलीप प्रभाकर धनावडे (निवृत्त सब ट्रेजरी ऑफिसर) आणि आपले कुटुंबीय यांचा मोलाचा वाटा आहे असे त्या आवर्जून सांगतात. कोणत्याही अडचणींनींची तमा न बाळगता मुला मुलींनी जास्तीत जास्त शिकावे, स्वतःला नेहमी कार्यमग्न ठेवावं, सृजन समाज निर्मितीस हातभार लावावा. आपल्या गावाचे नाव मोठं करावं असा सल्ला त्या आजही विद्यार्थ्यांना देताना दिसतात.
“शिक्षक रत्न ” पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्यावर रायगडमधून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, असे आदर्श शिक्षक सकारात्मक समाज निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावतात अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.