दरड व रस्त्यांची अद्यापही पूर्व तयारी नाही
संजय प्रभाळे
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्याने रविवारी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तालुक्याला जोडणारा दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. कारण याच मार्गावरील दिघी-वेळास दरम्यानच्या घाटातील दरड व रस्त्यातील खड्डे धोक्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरच पूर्ण करण्याची मागणी पुढे येत आहे.

तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर, दरडी कोसळणे या सारख्या आपत्ती, जास्त करुन घाट रस्त्याला होत असल्याने अनेक अपघाती घटना दरवर्षी समोर येत आहेत. मागील वर्षाला जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे दिघी-वेळास घाटात ठिकठिकाणी छोट्या मोठ्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रसंगी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने या मार्गावरील वाहने इतर रस्त्यांनी फिरवण्यात आली. कारण रस्त्याच्या कामासाठी येथील डोंगर पोखरण्यात आले आहेत. त्याशिवाय आता अर्धवट रस्त्यामुळे धोका उद्भवू शकतो अशी शक्यता प्रवाशांकडून वर्तवली जात आहे.
दिघी-वेळास मार्गावर दिघी पोर्टकडे जाणाऱ्या लहान-मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्यात पर्यटन म्हणून मुरुड व श्रीवर्धन तालुका याच मार्गाने जोडल्याने रस्त्याला बारमाही पर्यटकांच्या वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, या मार्गातील दिघीवरून येताना कुडगाव गावाच्या पुढे घाट रस्ता अर्धवट स्थितीत असून खोदकाम केलेलं आहे. त्यामुळे यंदा या मार्गाला पावसाळी धोका पाहता महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाचे या कडे कोणतीच पूर्व तयारी वा खबरदारी घेत नसल्याचे समोर येत आहे. याकडे संबधित खात्यांनी आपापली जबाबदारी ओळखून तिथे कोणताही अपघात होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यावी व या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक प्रवाशी करत आहेत.
संभाव्य आपत्तीकडे दुर्लक्ष नैसर्गिक आपत्तीचे पूर्व नियोजन केल्यास आपत्तीचे निर्मूलन करणे सोपे जाते. तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे निराकरण करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे आवाहन दरवर्षी प्रशासनाकडून केले जाते. मात्र, महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाची येथे अद्यापही पूर्व तयारी नाही. |
दिघी-वेळास मार्गात अपूर्ण रस्त्यामुळे या पावसाळी संपूर्ण रस्त्यावर चिखल व रस्त्यांच्या कामासाठी केलेल्या खड्ड्यांचा धोका पाहता संबंधित विभागाने योग्य ती काळजी घेऊन पावसाळी पूर्वी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
– उल्हास किर, वाहन चालक