• Thu. Apr 10th, 2025 10:36:20 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

९वा आंतरराष्ट्रीय योग दिन अलिबाग येथे उत्साहात संपन्न

ByEditor

Jun 21, 2023

दैनंदिन योग अभ्यास मुळे शरीर, मन, भावनांना स्वास्थ्य लाभते -जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

अलिबाग : जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले, आरोग्य संपन्न करणारे शास्त्र म्हणजे “योग”. दैनंदिन योग अभ्यासामुळे शरीर, मन, भावनांना स्वास्थ्य लाभते,असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज येथे केले.

आज दि. २१ जून २०२३ रोजी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पोलीस मुख्यालय मैदान, अलिबाग येथे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था,अलिबाग आणि अंबिका योग कुटीर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिर संपन्न झाले, त्यावेळी प्रमुख अतिथी आणि उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने,अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे, तहसिलदार श्री.सचिन शेजाळ, स्त्रीरोग तज्ञ डॉ. मेघा घाटे, ॲड.श्रीमती कलाताई,अध्यक्ष लायन्स क्लब श्रीबाग,श्री वीरेंद्र पवार, संचालक,अंबिका योग कुटीर संस्था, श्री.मोकळ, आर.पी आय, पोलीस मुख्यालय अलिबाग, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, बार्टी समता दूत- अनुजा पाटील, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या श्रीमती तपस्वी गोंधळी , अंबिका योगा कुटीर अलिबागच्या माधवी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

घार्गे पुढे म्हणाले की, 21 जून या “ जागतिक योग दिनाच्या” निमित्ताने भारताबरोबरच अनेक देशांमध्ये 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज साजरा होत आहे. समग्र स्वास्थ्य मिळविण्याच्या हेतूने “वसुधैव कुटुंबकम्” या पार्श्वभूमीवर आधारित “One World One Family” हा या वर्षीचा विषय आहे. स्वतः बरोबर पूर्ण जगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य योग च्या माध्यमातून संतुलित करणे, हा वैश्विक उद्देश या मागे आहे. यानिमित्ताने योग अभ्यासाचे महत्वही त्यांनी विषद केले.

सुरुवातीला श्रीमती तपस्वी गोंधळी यांनी सर्वांचे वॉर्मअप व्यायाम घेतले. त्यानंतर श्रीमती माधवी पवार यांनी उभ्याने योगासने, बैठे योगासने, झोपून योगासने त्यानंतर प्राणायाम घेऊन ओमकार आणि शेवटी योग दिनानिमित्त संकल्प घेऊन प्रार्थना घेण्यात येऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले, तर योगा चे महत्व आणि प्रात्यक्षिक श्रीमती माधवी पवार, अंबिका योग कुटीर संस्था यांनी आणि त्यांच्या योग साधकांनी केले. सूत्रसंचालन किरण करंदीकर यांनी केले. आभार प्रदर्शन राजेंद्र अतनुर, तालुका क्रीडा अधिकारी माणगाव यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस मुख्यालयाच्या सर्व अधिकारी कर्मचारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनुर, क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर, संदीप वांजळे, कर्मचारी प्रफुल पाटील, सिद्धार्थ खडांगळे, अंकित मिंडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!