अनंत नारंगीकर
उरण : मुंबई शिवडी – न्हावा शेवा सिलिंगचे प्रवेशव्दार म्हणून उदयास येत असलेल्या चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत रविवारी ( दि१०) विविध विकास कामांचा शुभारंभ चिर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील,उरण तालुका शेकापचे युवक संघटना उपाध्यक्ष दीपक मढवी व सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते समिर मढवी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मुंबई शिवडी – न्हावा शेवा सिलिंग या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील चिर्ले जंक्शन म्हणून उदयास येत आहे.त्यामुळे या ग्रामपंचायती मधिल विकास, प्रवास सुखकर होण्यासाठी चिर्ले-गावठाण ते जांभुळ पाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी ३५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते समिर मढवी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.तर जांभुळ पाडा अंतर्गत रस्तावर ग्रामपंचायत निधीतून पेव्हर ब्लॉक बसविणे,जांभुळ पाडा आदिवासी वाडी तिसाई देवी मंदिरासमोर समाज मंदिर उभारणे या कामांचा शुभारंभ सरपंच सुधाकर उर्फ काका पाटील, शेकापचे युवक संघटना उपाध्यक्ष दीपक मढवी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत,जेष्ठ नेते अशोक पाटील,उपसरपंच राजेंद्र घरत,माजी उपसरपंच निवृत्ती पाटील,आकाश टकले, बेबीबाई जगन्नाथ घरत, निखिल मढवी,निता कातकरी सर्व पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
