• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांमुळे एसटीतील महिलेची प्रसूती

ByEditor

Sep 10, 2023

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानतेमुळे धोका टळला

विश्वास निकम
कोलाड:
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल ते महाड दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती मुंबई गोवा महामार्गावरील खड्डयांमुळे एसटीतच झाली आहे मात्र, प्रसुती झालेली महीला सुखरूप असून बाल मात्र चिंताजनक असल्याने त्यास कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून अलिबाग येथे हलविण्यात आले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, पेण वडखळ येथून महाडकडे प्रवास करणारी गरोदर महिला ही पनवेल ते महाड एसटीने (क्र.एमएच १४, बीटी २६३२) प्रवास करीत असताना ही बस कोलाड नजीकच्या पुई महिसदरा पुलावर आली असता पुलावर पडलेल्या प्रचंड मोठ्या खड्डयांमुळे गचके खात कोलाडकडे येत असतांना अचानक त्या महिलेच्या पोटात दुखू लागले व तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. सदरील एसटी चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधानाने एसटी बस ही आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आणत त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले.

या केंद्रातील डॉ व्ही.बी. टिवडे व डॉ. एम एस. वाघ यांच्या प्रयत्नाने उपचार करुन त्या महिलेची सुखरूप प्रसूतीसाठी प्रयत्न करण्यात आले. यावेळी तांबे नर्स व लक्ष्मण होगाडे यांनी ही महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, महिला सुखरूप असून, बाळाचे वजन घटल्याने ते थोडे चिंताजनक असल्याचे दिसून आले, त्यामुळे त्यास अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

एसटीचे चालक गोविंद जाधव व वाहक नामदेव पवार यांनी प्रसांगवधान दाखवत वेळेवर महिलेला आंबेवाडी येथील शासकीय रुग्णालयात आणून मोलाचे सहकार्य केले व महिलेची या संकटातून सुखरूप सुटका झाली. परंतु, या खड्ड्यांचे काय? आता तरी उघडा डोळे बघा नीट, असा संताप नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध व्यक्त केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!