मनोज पाटील
कळंबोली : सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील गुणवंत माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणारा यंदाचा ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाला होता. सदर पुरस्कार ५ सष्टेंबर रोजी शिक्षक दिनी नरीमन पाॅईंड येथील टाटा थिएटर येथे झालेल्या शानदार शासकीय कार्यक्रमात शालेय शि़क्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षक आमदार कपिल पाटील, विक्रम काळे आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख १ लाख १० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबरोबरच समाजासाठी नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देणाच्या व त्याच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने पुरस्कार देण्यात येतो.
सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रविंद्र लिमये, कार्यवाह गीता पालरेचा, सचिव रविकांत घोसाळकर व सर्व संचालक, उपमुख्याध्यापक सुरेश मोरे, कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे, सर्व विभागाचे पर्यवेक्षक तसेच रायगड जिल्हातील सर्व मान्यवर व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य, प्रेम आणि प्रोत्साहनामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे, अशी भावना प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी व्यक्त केली आहे.
