सलीम शेख
माणगाव : माणगावपासून नऊ किमी अंतरावर असणाऱ्या इंदापूर गावी हॉटेल सुग्राससमोर मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव डंपरची दुचाकीस्वाराला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदरील अपघात बुधवार, दि. १३ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.
या अपघाताबाबत अधिक वृत्त असे की, माणगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर रात़वड हायस्कूल येथे लेखनिक म्हणून काम करणारे व चरई बु. ता. तळा गावचे रहिवासी असलेले योगेश गणपत पतारे (४२) हे शाळा सुटल्यावर आपल्या ताब्यातील दुचाकी स्वतः चालवीत मुंबई- गोवा महामार्गाने माणगाव बाजूकडे येत असताना इंदापूर गावी हॉटेल सुग्रास याठिकाणी आल्यावर मुंबई बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयवा डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार योगेश पतारे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.
