मिलिंद माने
मुंबई : मतदारसंघात रखडलेल्या विकासकामांसंदर्भात आम्ही निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यात एकत्रितरीत्या विधानसभा, विधानपरिषद सदस्य जमलो नव्हतो. त्यामुळे एकाबाजूला विकासकामे व दुसऱ्या बाजूला संघटना वाढीचे काम या गोष्टीचा विचार करून दर मंगळवारी मी, प्रफुल पटेल, आमदार, मंत्री एकत्रित बैठक घ्यायची ठरवले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
निवडणूक आयोगाबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही आमची स्पष्ट भूमिका निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. तशाच प्रकारची भूमिका ट्वीटर हँडलकडेही दाखल करणार आहोत असा स्पष्ट खुलासा माध्यमातून येत असलेल्या बातम्यांवर बोलताना तटकरे यांनी केला. राज्यातील मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाबाबत जी काही परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे त्यावर हे सरकार संवेदनशील असून सरकार योग्य व न्यायिक पध्दतीने सर्वांना न्याय कसा देता येईल असा प्रयत्न करेल असेही सुनील तटकरे म्हणाले.
