मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या ५ किमी रांगा, गणेशोत्सवापूर्वीच बसला फटका
सलीम शेख
माणगाव : मुंबई -गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातच गणेशोत्सवाला २ दिवस बाकी राहिले असताना शनिवार, रविवार सुट्ट्या आल्यामुळे कोकणात गणेशभक्तांची पावले आपल्या लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी वळली आहेत. त्यामुळे ता. १६ सप्टेंबर सकाळी १०.०० वाजल्यापासून मुंबई बाजूकडून माणगावकडे मुंबई-गोवा महामार्गावर ५ कि.मी. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न यंदाचे वर्षीही कायमच आहे. त्यामुळे या गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला.
माणगावात शनिवारी सकाळपासूनच महामार्गावर जवळपास ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. हि वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी माणगावमधील जिल्हा वाहतूक शाखा व माणगाव पोलीसांची पुरती दमछाक झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर ठीकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. चौपदरीकरणाचे काम सुरु असून माणगावजवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. इंदापूर व माणगाव येथील बायपास मार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी ही नित्याचीच होणार आहे. यंदाचे वर्षी वाहतूक कोंडी होवू नये व गणेशभक्तांना आपल्या गणरायाच्या दर्शनाला वेळेत पोहोचता यावे यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाच्या रस्त्याची पाहणी केली होती. मात्र, गणेश उत्सवाला काही तासच बाकी असताना महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न प्रवाशांना अनुभवायला मिळाले.
