• Sat. Feb 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

समन्वय समितीच्या बैठकीत समस्यांचे निराकरण करतांना अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी!

ByEditor

Sep 16, 2023

दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

विनोद भोईर
पाली :
सुधागड तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक नुकतीच पाली तहसील कार्यालयाच्या हिरकणी कक्षेत अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य संजय म्हात्रे, संदीप दपके, ललित ठोंबरे, सुरज शेळके, मंगेश पालांडे, गणेश शिंदे, अरविंद फणसे तसेच सचिव तहसीलदार उत्तम कुंभार, गटविकास अधिकारी लता मोहिते यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सदर बैठीत कृषी, पंचायत समिती, आरोग्य , सा.बा.विभाग, शिक्षण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, नगरपंचायत, भूमिअभिलेख, पोलीस, पुरवठा, महसूल, आदि विभागाचे अधिकारीसह स्टेट बँक ,बँकऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक उपस्थित होते . मात्र ग्रामीण पाणीपुरवठा, बीएसएनएल, जी.प.बांधकाम , महावितरण, सामाजिक वनीकरण, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परिवहन, बीएसएनएल आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते. त्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करून सदर अधिकाऱ्यांना समज देण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीच्या सुरुवातीस अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की, समन्वय समितीची बैठक ही काही अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली नसून तालुक्यातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील काही कारणास्तव लांबविलेली तसेच तांत्रिक अडचणीत असलेली विकास कामे मार्गी लावणे, तसेच शासकीय विभागात सर्वसामान्य नागरिकांची खोळंबलेली कामे संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणे हाच बैठकीचा हेतू असल्याचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. सुधागड तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागाचा आढावा घेत असताना संबंधित विभागाच्या अधिकारी सविता राठोड यांना पशुवैद्यकीय विभागातील योजनांबाबत, पशुधनाच्या लसीकरणाबाबत विचारले असता कर्मचारी संख्या कमी असल्याची सबब सांगून मोकळ्या झाल्या.

शिक्षण विभागाबाबत तालुक्यात असणाऱ्या खासगी शिक्षण संस्थामध्ये शिक्षणाचा मांडलेला बाजारीकरण यावर अंकुश ठेवण्याच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या, प्रत्येक शाळेमध्ये पुरेशे शिक्षक आणि ते वेळेवर शाळेवर पोहोचण्याच्या सूचना गटविकास अधिकारी साधुराम बांगारे यांना देण्यात आल्या.

कृषी खात्याच्या प्रश्नावर चर्चा करतांना शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम तसेच पीएम किसानची रक्कम जमा झाल्याबाबत शेतकरी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यास गेले असता शेतकऱ्यांना आपली रक्कम बँकेत जमा झाल्याचे सागितले जाते परंतु प्रत्यक्षात बँकेत रक्कम जमा नसते. शेतकऱ्याला कृषी कार्यालय ते बँक असे हेलपाटे मारून त्रास सहन करावा लागतो. तसेच तालुक्यात शेती लागवडीचे प्रमाण घटल्याने त्यासाठी शेतकरी शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे कसे वळतील याकरिता कृषी विभागाने वेगवेगळे मेळावे घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे असल्याची दक्षता कृषी खात्याने घ्यावी असे अध्यक्षांसह सदस्यांनी कृषी अधिकारी यांना सूचित केले.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती बांधकाम विभागात काही ठिकाणी कामे न करताच बिले काढण्यात आल्याचा पुरावा देत सदर विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप समन्वय समिती सदस्य सुरज शेळके यांनी केला. सदर प्रकाराबाबत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल असे गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी सांगितले. यावेळी बैठकीत संबंधित खात्याचे उपस्थित अधिकारी यांच्याशी त्या त्या विभागातील समस्यांबाबत संवाद साधत समस्यांचे तात्काळ निराकरण कसे होईल याकडे लक्ष देऊन पुढच्या बैठकीस या समस्याचे निराकरण झालेले असेल अशी आशा बाळगून समितीचे सदस्य सचिव तहसीलदार कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

समन्वय समितीच्या बैठकीच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेऊन ही कामे प्रगतीपथावर आणून पूर्ण करणे तसेच शासकीय कार्यालयातील सर्वसामान्य नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लावणे हाच या समितीचा खरा उद्देश असून मी आणि आमची टीम साध्य करून दाखविणार.

-अनुपम कुलकर्णी,
अध्यक्ष, समन्वय व पुनर्विलोकन समिती सुधागड

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!