खड्ड्यांचे विघ्न पार करत गणेशभक्तांचा मुंबई गोवा महार्गावरून प्रवास
विशेष प्रतिनिधी
रायगड : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांच्या मार्गात विघ्न आलं आहे. मात्र गणपती बाप्पावर अपार श्रद्धा असलेला चाकरमानी हे खड्ड्यांचे विघ्न पार करीत गावाकडे निघाला आहे. मुंबईत कामा-धंद्यानिमित्त कोकणी माणूस राहत असला तरी, त्याची नाळ आपल्या गावाशी जोडलेली आहे. त्यामुळे होळी गणपती मे महिन्यात व अन्य सणाला कोकणी माणूस आवर्जून आपल्या गावी जातो. यात गणेशोत्सवासाठी सर्वाधिक चाकरमानी आपल्या गावी जातात, त्यामुळे या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वे चार महिने अगोदरच तर एस. टी., खासगी बस सुमारे एक महिना आधीच हाऊसफुल्ल होतात. गणपती स्पेशल रेल्वे व ज्यादा एस.टी.ची घोषणा होताच, त्याही अवघ्या काही मिनिटांत हाऊसफुल्ल होतात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून मुंबईतून एस.टी. व खासगी बस सोडल्या जातात. पण, यातही अनेकांना जागा मिळत नाही. त्यामुळे काही चाकरमानी आपल्या खासगी गाड्यांसह टुरिस्ट गाड्या घेऊन कोकणात जातात. कोरोना महामारीनंतर कोकणात गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या घटली होती. मात्र, यंदा ही संख्या प्रचंड वाढली आहे. शनिवार, रविवार सुट्टी आल्यामुळे शुक्रवारपासूनच चाकरमानी कोकणात जाण्यास निघाले आहेत.
रेल्वेसह एस.टी बस., खासगी बस हाऊसफुल्ल झाल्या असून, सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त खासगी व टुरिस्ट लहान गाड्या शुक्रवार, 15 सप्टेंबर रात्रीपासून सोमवार, 18 सप्टेंबर रात्रीपर्यंत कोकणात रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे, सर्वच गाड्या हाऊसफुल्ल झाल्यामुळे 16 सीटर टेम्पो ट्रॅव्हलरसह स्कूल बसही आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच 12 लाखांहून जास्त चाकरमानी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील एका लेनचे काम गणपतीपूर्वी पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन वारंवार देऊनही हे काम मात्र अद्यापपर्यंत पूर्ण होताना दिसत नाही त्यामुळे यंदाही गणेशभक्तांना खड्ड्यांचे विघ्न पार करूनच गावी जावे लागणार आहे. कासूपासून पुढील इंदापूरपर्यंतचा रस्ता नवीन तंत्रज्ञान वापरून पूर्ण केला जात आहे. मात्र गणेशोत्सव ३ दिवसांवर आला तरीही हे काम वेगाने होताना दिसत नाही. पळस ते वाकण दरम्यान एकाच लेन असून इथे पेव्हर ब्लॉक टाकलेले आहेत. ते सुद्धा सुस्थितीत नसून या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. पनवेल पळस्पे, शिरढोण गाव, आपटा फाटा, जिते, कोपर फाटा, शितोळे मार्ग, धाऊळपाडा, नागोठणे, पाली फाटा, कोलाड, माणगाव, चिपळूण याठिकाणी रस्त्याची दुरवस्था आहे. गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास यंदा विनाखड्ड्यांचा होणार अशा घोषणा मंत्र्यांकडून केल्या जात होत्या मात्र त्या भूलथापाच असल्याचा अनुभव महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना येत आहे.
