• Sat. Feb 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गणेशोत्सवात खड्डे दुरुस्तीचा पडला विसर!

ByEditor

Sep 16, 2023

खड्डे दुरूस्तीची कायमची मागणी मात्र, बांधकाम विभागाचे पालथ्या घड्यावर पाणी

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुका प्रशासनाने गणेशोत्सवात सुविधा पुरविण्याचा दावा केला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला महत्त्वाच्या रस्ते दुरुस्तीचा विसर पडला आहे.

दोन दिवसांनी घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने अनेक शहरातून चाकरमान्यांचा ताफा गावाकडे निघणार आहे. मात्र, ज्या रस्त्यावरून गणेशमूर्तींचे आगमन-विसर्जन होणार; त्याच रस्त्यांची दुरुस्तीला बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने खड्ड्यांचा त्रास प्रवाशी व भाविकांना होणार आहे. बोर्लीपंचतन शहरातून श्रीवर्धनकडे जाणाऱ्या सरळ मार्गावर ज्ञानमंदिरपर्यंत तीन साकव खचले असून याच मार्गावर वावे-बोर्ला गावापर्यंत छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्तीसाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. त्याच दरम्यान खड्डे बुजवण्याचे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र, डागडुजी न केल्याने खड्ड्यांचा भस्मासुर पुन्हा पावसाच्या अधिक तीव्रतेने नागरिकांच्या जिवावर उठला आहे. ज्ञानमंदिर जवळील मोरी खचल्याने या खड्ड्यातील प्रवास सणासुदीच्या दिवसात धोकादायक बनला आहे.

बोर्लीपंचतन ज्ञानमंदिराजवळची मोरी निकृष्ट कामामुळे खचली आहे. दुरुस्तीची मागणी मागील महिन्यापासून होत असताना, बांधकाम विभागाकडून दुर्लक्षच झाले. तर पावसाळी दुरुस्तीचे काम होत नसल्याचे कारण नेहमीप्रमाणेच सांगण्यात आले. त्यामुळे यंदाही वाटेतील खडयांमुळे बाप्पा आता तूच मार्ग काढ, अशी विघ्नहर्त्यांलाच साकडे घालण्याची वेळ गणेशभक्तांवर आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!