अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यातील चिटफंड योजनेतील गुंतवणूकदारांना मंगळवारी (दि. १९) येऊ घातलेल्या गणेशोत्सवापूर्वी पैसे परत देतो असे आश्वासन चिटफंड योजनेतील मुख्य मोरक्या सतिश गावंड यांनी दिले होते. मात्र, गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही आजतागायत चिटफंड योजनेतील पैशाची रक्कम पिरकोण गावातील सतीश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील किंवा एजंट लोकांकडून न दिल्याने सध्या गुंतवणूकदार सैरभैर झालेल्या मनस्थितीत वावरताना दिसत आहेत. याचा फटका या वर्षी उरण बाजार पेठेतील व्यावसायिकांना गणेशोत्सवात जोरदार बसला असल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

उरण परिसरात चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हजारोंच्या संख्येने भोळ्याभाबड्या लोकांनी अमाप पैसे हे पिरकोण गावातील सतिश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील या व्यक्तींकडे एजंटच्या मदतीने गुंतवले आहेत. त्यामध्ये गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली असून सदर प्रकरण हे पोलीस यंत्रणेकडून न्याय प्रविष्ट झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे सध्या आपआपले चिटफंड योजनेत अडकलेले लाखो, करोडो रुपये, सोनाराच्या पेढीवरील दागिने कशा प्रकारे मिळतील या मनस्थितीत राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या दालनात, घरी हेलपाटे मारताना दिसत आहेत.

त्यामुळे आपली तसेच एजंट लोकांची अटक टाळण्यासाठी चिटफंड योजनेतील मुख्य मोरक्या सतिश गावंड यांनी सदर गुंतवणूकदारांना मंगळवारी (दि. १९) येऊ घातलेल्या गणेशोत्सवापूर्वी मुद्दलीचे पैसे परत देतो असे आश्वासन दिले होते. मात्र गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही चिटफंड योजनेतील मुख्य मोरक्या सतिश गावंड, सुप्रिया पाटील किंवा एजंट लोकांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर ठाकला आहे. एकंदरीत गावोगावच्या अनेक गुंतवणूकदारांकडे पैसे नसल्याने त्यांनी उरण तालुक्यातील बाजारात जाणे टाळले आहे. त्याचा फटका हा बाजारपेठेतील व्यवसायिकांना बसला असल्याचे व्यावसायिकांकडून सध्या सांगण्यात येत आहे.
