अलिबाग : कोलाडनजीक तिसे रेल्वे फाटकात रेल्वे कर्मचारी चंद्रकांत कांबळे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. चंद्रकांत यांचा मारेकरी विजय रमेश शेट्टी याला रायगड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रकांत याने आपल्या बहिणीसाठी 10 लाखाची पोटगी मागितल्याने विजयने त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने दोन दुहेरी हत्याकांड केल्याचे रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. त्याच्याकडून दोन रिव्हॉल्वर जप्त करण्यात आल्या आहेत.

पाले बु. ता.रोहा येथे राहणारे चंद्रकांत कांबळे यांची बहीण विमल हिचा विवाह 2016 मध्ये विजय रमेश शेट्टी सोबत झाला होता. रोह्यातील धाटाव येथे ते राहत होते. काही महिन्यांपासून विजय व त्याची पत्नी विमल यांचे पटत नव्हते. म्हणून विमल तिच्या माहेरी भाऊ चंद्रकांत याचेकडे राहण्यास होती. ती विजय शेट्टी याचेकडे घटस्फोट मागत होती. विजय शेट्टीकडे चंद्रकांत कांबळे हे बहिण विमल हिच्यासाठी 10 लाखांची पोटगी मागत होते. त्यावरुन विजय शेट्टी याने तुझ्या भावाला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी पत्नी विमल हिला दिली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांची टीम कामाला लागली. मिळालेल्या पुराव्यावरुन ही हत्या विजय यांनेच केली असल्याचे पुढे आले आणि विजयचा शोध सुरु झाला.
हत्या केल्यानंतर काही दिवसांनी तो अलिबाग येथे एका मित्राला भेटून गेला होता. तांत्रिक तपासात तो अक्कलकोट, जिल्हा सोलापूर याठिकाणी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक, विकास चव्हाण, जितेंद्र चव्हाण,अमोल हंबीर, प्रतिक सावंत, अक्षय सावंत अशी चार पथके तयार करण्यात आली होती. एक पथक अक्कलकोट येथे रवाना झाले होते. अक्कलकोट येथील स्वामी समर्थमंदिर परिसरातून विजयला पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. विजयकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल मॅग्झीनसह, एक एक्स्ट्रा मॅग्झीन व 18 जिवंत काडतुसे, 1 रिकामी पुंगळी हस्तगत करण्यात आली आहे. दोन्ही हत्यार त्याने चंद्रकांत कांबळे यांची हत्या करणेसाठी दोन महीन्यांपूर्वी बनारस उत्तरप्रदेश येथून दिड लाख रुपयांना त्याने विकत विकत घेतली. अटक केल्यानंतर त्याला रोहा न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस उप निरीक्षक धनाजी साठे, पोलिस उप निरीक्षक विकास चव्हाण, पोलिस उप निरीक्षक विशाल शिर्के आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार -डख प्रसाद पाटील, दीपक मोरे, पोलिस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, प्रसन्न जोशी, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतीक सावंत, श्यामराव कराडे, जितेंद्र चव्हाण, सुदीप पहेलकर, राकेश म्हात्रे, विकास खैरणार, रुपेश निगडे, पोलिस नाईक विशाल आवळे, सचिन वावेकर, पोलिस शिपाई ईश्वर लंबोटे, भरत तांदळे, बाबासो पिंगळे, अक्षय सावंत, अक्षय जगताप, ओंकार सोंडकर, मोरेश्वर ओंबळे, लालासो वाघमोडे, स्वामी गावंड, रुपेश पाटील सायबर पोलिस ठाणेचे तुषार घरत, अक्षय पाटील. यांनी या गून्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
याआधी केल्यात चार हत्या
विजय याने 90च्या दशकात त्याची बहीण शांताबाई हिचा पती सिद्धप्पा व पतीचा भाऊ बसप्पा या दोघांची निर्घुण हत्या केली होती. तसेच सन 1999 साली उरण येथील एबीजे कंपनीचे मॅनेजर व त्याचा ड्रायव्हर अशा दोन इसमांना गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती प्राप्त झाली होती.
