गणेश पवार
कर्जत : सध्या डेंग्यूच्या आजाराचा प्रादुर्भाव हा राज्यात दिसून येत असताना व शासन स्तरावरून प्रशासनास सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या जात असतानाच, कर्जत शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी काही रूग्ण हे खासगी तर काही कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. या डेंग्यूच्या आजाराने कर्जत शहरातील नागरिक त्रस्त असल्याचे दिसत असतानाच याकडे कर्जत नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर याबाबत रुग्ण प्रसार माध्यमांशी समोर बोलायला तयार नसले तरी एक एक घरात दोन ते चार रुग्ण या आजाराने पीडित असल्याचे सध्या कर्जत शहरात सुरू असलेल्या चर्चेतून पुढे येत आहे.
कर्जत नगरपालिकेच्या हद्दीतील व कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महावीर पेठ व काही परिसरात डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. तर साधारण पंधरा ते वीस रुग्ण हे डेंग्यूच्या आजाराने त्रासले असून, सध्या काही रूग्ण हे कर्जत शहरातील खासगी रुग्णालयात तर काही उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहेत. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जत शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वच्छ सुंदर म्हणून पारितोषिके प्राप्त कर्जत नगरपालिकेच्या मुख्य कर्जत शहरातच डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आता यावर नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी विषयी मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. डेंग्यू या अजाराची लागण ही प्रामुख्याने हा आजार साठलेल्या पाण्यामुळे व त्यामधून निर्माण होणाऱ्या डासांच्या प्रादुर्भावामुळे होतो. कर्जत शहराला लागून असलेल्या उल्हास नदी किनाऱ्याचा परिसर हा स्वच्छ दिसत असून नदीचे पाणी देखील वाहते असतानाही या परिसरात डेंग्यू फैलण्याचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ अधीकारी डॉ. विजय म्हसकर यांच्याकडून पत्रकार यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार एखाद्या इमारतीच्या टेरेसवर साचलेले पाणी किंवा ग्लास किंवा इतर साहित्यात थोडे एक दोन ml पाणी जरी साठून राहिले तर यावर डेंग्यूचे डास हे अळ्या घालतात, काही ठिकाणी गटारे तुंबली असतील, वेळच्या वेळी फवारणी होत नसेल तर अशा ठिकाणी डास, अळ्या, कीटक वाढत जातात व डेंग्यूचा परिणाम दिसून येतो.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जून महिन्यात डेंग्यूचे पाच, जुलैमध्ये चार तर ऑगस्टमध्येही चार रुग्ण होते. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात बारा रुग्ण हे उपचारासाठी आले होते. तर काही इतर खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे रुग्ण शहरातील आहेत की नाही हे लगेच सांगता येणार नाही असे डॉ. म्हसकर यांनी सांगितले. कर्जत शहरातील नागरिकांमध्ये होत असलेल्या चर्चेतून काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तेथील कचरा उचलला जात नाही, तर उचललेल्या कचऱ्याच्या ठिकाणी पुन्हा नागरिक कचरा उघड्यावर टाकतात, फवारणी वेळच्यावेळी होणे गरजेचे असताना, नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तीही होताना दिसत नाही. तसेच नागरिकांनीही नगरपालिकेला सहकार्य केले पाहिजे हे आमचे कर्तव्य आहे परंतु काही नागरिक ऐकत नाहीत. या बाबी समोर येत आहे. कर्जत नगरपालिकेचे मुख्याअधिकारी वैभव गारवे यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता पालिका प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यूच्या फैलावा संदर्भांत एक आढावा बैठक पार पडली असून, परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच परस्थिती पाहाता कर्जत शहरात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण वाढत चालले असून, याकडे कर्जत नगरपालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा मोठ्या संकटांना कर्जत शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.
