• Fri. Feb 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्हा रुग्णालयात प्रत्येक बुधवारी होणार दिव्यांगांची तपासणी

ByEditor

Sep 20, 2023

वार्ताहर
अलिबाग :
नैसर्गिक अथवा अपघाताने आलेल्या दिव्यंगत्वाची तपासणी करून शारीरिक व मानसिक दृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या बांधवाना जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. ज्या प्रमाणपत्राच्या सहाय्याने विविध शासकीय योजनांचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळतो. सदरील प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथे सध्या अस्थिव्यंग व भिषक याविभागाकरिता बुधवार व नेत्र, मानसिक आणि कर्ण-मुकबधीर या विभागांकरिता गुरुवार रोजी कामकाज सुरु आहे. परंतु अनेक रुग्णांना एकाधिक अपंगत्व असल्याने बुधवार व गुरुवार या दोन्ही दिवशीच्या समितीतील तज्ञ वैद्यकिय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेण्याकरिता उपस्थित राहावे लागत होते. तसेच सदर प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असल्याने अनावधानाने मिळालेल्या माहितीनुसार रुग्ण व त्याचे नातेवाईक चुकीच्या दिवशी प्रमाणपत्राकरिता रुग्णांना घेऊन आल्यास, तपासणी समितीचे बोर्ड त्या दिवशी अद्ययावत नसल्याने तपासणी करून देखील प्रमाणपत्र वितरीत करणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांना निराशेला सामोरे जावे लागते.

सदर रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन, दि. ०१ ऑक्टोबर २०२३ पासून अस्थिव्यंग, भिषक, नेत्र, मानसिक आणि कर्ण-मुकबधीर या सर्व विभागातील दिव्यांग बांधवांची तपासणी प्रत्येक बुधवारी जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग येथे एकाच दिवशी करण्यात येईल असा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी घेतला आहे.

त्याचबरोबर उप जिल्हा रुग्णालय, पनवेल येथे प्रत्येक शुक्रवारी व उप जिल्हा रुग्णालय, माणगाव येथे महिन्यातील पहिल्या बुधवारी तसेच आवश्यकतेनुसार उप जिल्हा रुग्णालय, महाड येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबीर संपन्न होईल. व कर्ण-मुकबधीर आणि ज्या रुग्णांच्या तपासणीकरिता सी टी स्कॅन अहवाल आवश्यक आहे अशा रुग्णांची तपासणी प्रत्येक बुधवारी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे होईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी जाहीर केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!