विश्वास निकम
कोलाड : विभागातील दीड दिवसांच्या बाप्पांचे बुधवार, दि. २०/९/२०२३ रोजी गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात ढोलताशांच्या तसेच टाळ मृदूंगाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत भावपुर्ण निरोप देत घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. बाप्पाच्या आगमनापासून ते दीड दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनापर्यंत मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे भक्तगणांचा थोडाफार हिरमोड झाला होता. तरीही लाडक्या बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

कोलाड विभागात मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी एकूण १९६९ घरगुती गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. तर घरगुती खाजगी ७८० दीड दिवसांच्या बाप्पांचे बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. ११३८ पाच दिवसांचे, एक सात दिवसाचा तर ४० दहा दिवसांचे घरगुती, ९ सार्वजनिक असे एकूण १९६९ गणपती बाप्पांचे कोलाड आणि परिसरातील गाव, वस्ती, वाड्यांवर मोठया उत्साहाने तसेच भक्तिमय वातावरणात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत आगमन झाले.
