• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोहा : खैराची कत्तल सुरूच, वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

ByEditor

Sep 21, 2023

जंगल बोडके करण्याचा ईरादा आहे का? सामान्यांचा सवाल
चोराटी खैर वनविभागाकडून जप्त, गुन्हा दाखल करण्याची मागणी

शशिकांत मोरे
धाटाव :
मुरुड वनक्षेत्र हद्दीतील रोहा तालुक्यातील चणेरा जंगलभागात अवैध वृक्षतोड चांगलीच फोफावली आहे. मुख्यतः मुरुड वनक्षेत्र हद्दीत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याचे अनेकदा समोर येऊनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कठोर कारवाई करण्यात नेहमीच कुचराई करतात याचे आश्चर्य आहे. जंगलात झाडांची कत्तल चालू असतानाच चणेरा विभागातील खांबेरे हद्द जंगलात मोठ्या प्रमाणात खैर झाडांची तोड करून तस्करी करण्याची घटना समोर आल्याने वनाधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष नाही ना, सर्वच जंगल बोडके करण्याचा ईरादा आहे की काय? असा सवाल आता सामान्यांनी, वनप्रेमींनी उपस्थित केला आहे. दरम्यान, जंगलात अवैध तोड केलेल्या खैराच्या तस्करीची चर्चा होताच अखेर वनविभागाला जाग आली. तोड केलेला खैर जप्त करण्यात आल्याची माहिती उशिरा सुचलेल्या शहाणपणातून वनविभागाने दिली तर खैराची मोठ्या प्रमाणात तोड करून तस्करी करणाऱ्या संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता शहानवाज मुकादम यांनी केली आहे. आता वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, गुन्हा दाखल करतात का? हे पाहावे लागणार आहे.

चणेरा विभागातील खांबेरे हद्दीच्या पांगळोली जंगलात अवैधपणे खैराची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लाकडांची तस्करी करून मातीमोल किंमतीत विकली जात आहेत. हे अनेकदा उघड झाले, तशा तक्रारी वनपाल, वनक्षेत्रपाल यांच्याकडे झाल्या, पण तक्रारींकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यामुळे खैर चोरट्यांचे बळ अधिक वाढले. विविध झाडांची मुख्यत: खैराच्या अवैध तोडीने जंगल बोडके होत आहे. इतर झाडांचीही कत्तल सुरूच आहे. याउलट जंगल तोडीला वनविभागातील अधिकारीच कारणीभूत आहेत, त्यांचा वचक राहीला नाही, आर्थिक संबंधातून खैर चोरी अविरत सुरू आहे, असा आरोप मुकादम यांनी केला.

रविवारी रात्रीच्या सुमारास खांबेरे हद्दीतील झाडे तोडून रातोरात वाहतूक करण्याचा इरादा पोलिसांनी अप्रत्यक्ष हाणून पाडला. गणेशोत्सवानिमित्त ठेवण्यात आलेल्या बंदोबस्तामुळे हा डाव उघडकीस आला. स्थानिक दलालाच्या मदतीने हे सर्व सोपस्कार चालू होते, त्याला वनविभागातील काही वनपालांचा वरदहस्त होता, हे स्पष्ट झाले. याच गंभीर घटनेची दखल घेत मंगळवारी मुरुड वनक्षेत्रपाल प्रियांका पाटील यांनी खांबेरे हद्दीतील अवैध खैर जप्त केला. मूळात खैर तोड व तस्करी झाली नाही, ही वरिष्ठांना वनपालांनी दिलेली माहिती खोटी ठरली, हे समोर आल्याने नेमके गौडबंगाल काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

खैर तोड व तस्करी झाली नाही, नंतर खैराची बेमालूम तोडलेली झाडे आढळून आली, याचा अर्थ काय? याचे उत्तर आता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. स्थानिक दलालामार्फत खैराची लाकडे विकत घेणारा व्यापारी महाड येथील असल्याची दबकी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. विभागाने त्या दलाल व्यापाराचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी चोहोबाजूने झाली आहे. खैराची कत्तल व तस्करी करणे हा चोरट्यांचा व वनविभागाचा जणू काही पाटशिवणीचा खेळ असल्याची मजेशीर चर्चाही नागरिकांत सुरू आहे. त्यामुळे झाडांची, खैराची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळत नाही. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. याच आरोपात आता खैर तस्करी विरोधात गुन्हा दाखल होतो का? हे समोर येणार आहे. दरम्यान, मुरुड हद्द वनविभागाच्या वनक्षेत्रपाल प्रियांका पाटील याबाबत नेमकी काय कारवाई करतात, त्या कितपत प्रामाणिकपणा दाखवतात, खांबेरे खैर तस्करी प्रकरणाची वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय दखल घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर संबंधित खैर चोरट्यांवर कारवाई न केल्यास आपण आंदोलनात्मक पातळीवर भूमिका घेऊ असे मुकादम यांनी ठणकावून सांगितल्याने आता काय होते ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!