अनंत नारंगीकर
उरण : उरण विधानसभा मतदार संघातील केळवणे परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रीय झाली असून भर गणपतीच्या सणांमध्ये रात्रीच्या वेळी गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन गुरे चोरून नेली जात आहेत. पर्यायाने बळीराजाचे पशुधन संकटात आले असल्याने या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

उरणच्या परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या पशुधन कमी झाले असले तरी काही गरीब शेतकरी घरातील दूध दुभत्यासाठी व शेतीच्या कामासाठी पशुधन सांभाळून ठेवत आहेत.मात्र या पशुधनावर काही चोरट्यांची नजर पडली असून केळवणे येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावात कोणी जागे नसल्याचा फायदा घेऊन जवळपास रस्त्यावर बसलेल्या सहा गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गणपतीचा सण असल्याने गुरांच्या आवाजाने गावातील रस्त्यावर फिरत असलेल्या लोकांनी बेशुद्ध पडलेली गुरे पहिली आणि लोकांनी आरडाओरड केल्याने गुरे चोरणारी टोळी त्या ठिकाणाहून पळून गेली. साधारणतः इनोव्हा गाडी असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
एकंदरीत लोकांच्या सतर्कतेमुळे ही जनावरे चोरट्यांच्या तावडीतून वाचली असली तरी असे प्रकार विविध ठिकाणी अनेक वेळा घडले आहेत. चिरनेरमध्ये रानसई रोडवर तर गुरे कापण्याचे प्रकार घडले आहेत. गोवठणे येथेही गुंगीचे इंजेक्शन मारून बेशुद्ध करून गुरे चोरण्याचा प्रकार घडला होता. उरणमधील नागाव, बोरी, जांभुळपाडा, कळंबुसरे, द्रोणागिरी भागात असेच गुरे चोरीचे अनेक प्रकार घडले आहेत. हे गुरे चोरण्याचे प्रकार स्थानिक एजंटच्याच मदतीने होत असल्याचे नागरिक बोलत आहेत. शेतकऱ्यांचे पशुधन वाचण्यासाठी पोलीस यंत्रणेने या टोळ्यांसह त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक एजंटांचा सुद्धा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
