अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यात गणेशोत्सवात सातत्याने होणारा विजेचा लपंडाव, खोपटा पुल-कोप्रोली आणि गव्हाण फाटा-दिघोडे-विंधणे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या यामुळे गणेशभक्त बेजार झाले आहेत. तरी महावितरणचे अभियंता आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सदर समस्यांकडे दुर्लक्ष न करता उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी गणेश भक्त करत आहेत.
नवी मुंबई परिमंडळ – २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ( दि. १८) उरणच्या भोईर गार्डन हॉटेलच्या सभागृहात झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरील बैठकीत सामाजिक सलोखा आणि शांततेत मोठ्या आनंदात गणेशोत्सव सण साजरा करण्यात यावा असे आवाहन विविध पक्षांचे पदाधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, उपस्थित नागरिक, प्रशासकीय अधिकारी यांना करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी गणेशोत्सवात विजेची समस्या, वाहतूक कोंडी समस्या उध्दभवणार नाही यासाठी संबंधित प्रशासनाने सतर्क राहावे असे सुचित केले होते. मात्र, राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी यांना नेहमी फाट्यावर मारणाऱ्या महावितरणच्या अभियंता व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चक्क यावेळी गणेशोत्सवात सातत्याने वीज पुरवठा खंडित करुन व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण करत आपआपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाला फाट्यावर मारण्याचे काम केले आहे. एकंदरीत सततच्या वाहतूक कोंडीमुळे व विजेच्या समस्येमुळे गणेशभक्त हैराण झाले आहेत.
गणेशोत्सवात विजेची समस्या व वाहतूक कोंडी उद्भवणार नाही यासाठी महावितरण कंपनीचे अभियंता व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ठोस उपाययोजना न केल्याने आज गणेशोत्सवात भाविकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. ही खरी शोकांतिका आहे
–अनंत ठाकूर
सामाजिक कार्यकर्ते, खोपटा
