किरण लाड
नागोठणे : पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या मातांना शारीरिक मार्गदर्शन व मानसिक समुपदेशन देण्यासाठी राष्ट्रीय सेवा भारती तर्फे अनोखा उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच भाग म्हणून सदर उपक्रमाची महिलांना विस्तृत माहिती होण्यासाठी कार्यक्रम केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्री कानिफनाथ मंदिर मराठाआळी, नागोठणे येथे आयोजित केला आहे.
पहिल्या 1000 दिवसांमध्ये बाळाची शारीरिक व मानसिक वाढ वेगाने होत असते. यात गर्भधारणेचे 270 दिवस आणि जन्मानंतरचे 730 असे मोजले जातात. या कालावधीत नवजात शिशुच्या विकासाबरोबर बाळंतीण मातेचेही आरोग्य उत्तम राहण्यासाठी पहिले 1000 दिवस हे सोनेरी दिवस असतात. या कालावधीत बाळाला तसेच मातांना काय पोषण द्यायचे तसेच बाळ आणि माता यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भातील विस्तृत माहिती महिलांना देण्यासाठी याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक मंदार परांजपे आज सायंकाळी ६ वाजता श्री कानिफनाथ मंदिर मराठाआळी केएमजी विभाग येथे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केएमजी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल नागोठणेकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
