• Fri. Feb 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिरनेर जंगल सत्याग्रह व चिरनेर गाव

ByEditor

Sep 25, 2023

घन:श्याम कडू
उरण :
१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे उरण तालुक्यातील चिरनेर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नकाशावर आले. या परिसरात आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी इ. लोकांचे प्राबल्य होते आणि बहुसंख्य ग्रामस्थांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय. इंग्रजांनी २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर, कळंबसुरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे इ. गावातील गावकऱ्यांना जंगलातील लाकडे तोडण्यास मनाई केली. गावकऱ्यांनी काठ्या, कोयते, कुऱ्हाड, विळे इ. विविध अवजारे घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. सत्याग्रहात सामील होण्यासाठी अनेक ग्रामस्थ रस्त्यावर आले. महात्मा गांधीनी सुरु केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीला पाठींबा देण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची तमा न बाळगता सत्याग्रह करून इंग्रजांचा रोष ओढून घेतला.

इंग्रजांनी केलेल्या गोळीबार आणि लाठीहल्ल्यामुळे अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले, तर काहींना कायमचे अपंगत्व आले. या सत्याग्रहात धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे) हे सत्याग्रही हुतात्मा झाले. या जंगल सत्याग्रहाला चिरनेर जंगल सत्याग्रह म्हणून ओळखले जाते.
जंगल सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरनेर गावात दोन हुतात्मा स्मारक बांधलेली आहेत. या स्मारकाच्या शेजारी हुतात्मा स्मारक शिल्प उभारण्यात आलेले असून या स्मारक शिल्पात हुतात्म्यांची शिल्प उभारण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर १९३२ साली पाडलेल्या स्मृतिस्तंभाचा कळस ह्या स्मारक शिल्पात जतन करून ठेवला आहे.

सत्याग्रहाच्या वेळी झालेल्या गोळीबारात एक गोळी महागणपती मंदिराच्या गजाला लागली. सत्याग्रहाची आठवण म्हणून तो गज अजूनही मंदिरात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. हुतात्मा स्मारकाबरोबर शिलाहार-यादवकालीन गद्धेगळ आणि इतर प्राचीन अवशेष पण बघण्यासारखे आहेत. श्री क्षेत्र महागणपती हे चिरनेर गावाचे ग्रामदैवत. चिरनेर गावात महागणपतीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे. गर्भगृहातील महागणपतीची मूर्ती अंदाजे ३००-४०० वर्ष किंवा त्याच्यापेक्षाही जुनी असावी. मूर्तीचे मूर्तिभंजकांपासून रक्षण करण्यासाठी मंदिरासमोर असलेल्या तलावात लपवून ठेवण्यात आली. पेशव्यांचे कल्याण येथील सुभेदार रामजी महादेव फडके चिरनेर येथे वास्तव्यास असताना त्यांना गणपतीने दृष्टांत झाला. दृष्टांतानुसार तलावातून गणपतीची चतुर्भुज मूर्ती बाहेर काढण्यात आली आणि तलावाशेजारी या महागणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली अशी आख्यायिका महागणपतीच्या मूर्तीबद्दल सांगण्यात येते.

महागणपती मंदिराच्या शेजारी शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर आधुनिक दिसत असले तरी या ठिकाणी एखादे जुने मंदिर असावे असे तेथील विविध शिल्पावरून वाटते. सभामंडपातील असलेली नंदीची मूर्ती, गर्भगृहाच्या देवकोष्टकात असलेली गणपती आणि अजून एका देवतेची मूर्ती, गर्भगृहाच्या ललाटबिंबावरील गणेशमूर्ती, गाभाऱ्यात असलेले शिवलिंग आणि मुळची भैरवाची पण आता देवीची मूर्ती इ. अनेक शिल्प मंदिराचे प्राचीनत्व सिध्द करतात.

मंदिरपरिसरातील दोन गध्देगळ आहेत. या दोन्ही गद्धेगळ शिलाहार-यादवकालीन असाव्यात. शिवमंदिराच्या शेजारी छोट्या मंदिरात एक गद्धेगाळ आहे. मात्र शेंदूर फासल्यामुळे शिलालेख नष्ट झाला आहे. मंदिरात स्थानिक देवतेची मूर्ती पण आहे. दुसरी गद्धेगाळ मंदिराच्या शेजारी उघड्यावर आहे. या गद्धेगाळालासुध्दा शेंदूर लावलेला असल्यामुळे शिलालेख नष्ट झाला आहे. श्री क्षेत्र महागणपती मंदिराकडे जाताना एका घराच्या अंगणात घुमटी प्रकारातील मध्ययुगीन दोन स्मृतीशिळा आहेत. एका शिळेवर स्त्री-पुरुष तर दुसरीवर फक्त पुरुषाचे चित्र आहे.

चिरनेर जंगल सत्याग्रहात हुतात्मा दिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे. फक्त २५ सप्टेंबरलाच चिरनेर जंगल सत्याग्रहाची आठवण होते. इतर दिवशी सर्वानाच विसर पडलेला दिसून येतो. तसेच हुतात्मा स्मारकांची उभारणी करण्यात आली आहे, त्याचीही दुरवस्था होऊन ही याकडे प्रशासनही लक्ष देत नसल्याने नाराजीचा सूर निघत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!