• Thu. May 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सिडकोत एसीबीचा ‘मोठा घाव’; २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप अटकेत

ByEditor

May 14, 2026

नवी मुंबई । अमुलकुमार जैन
नवी मुंबईतील सिडको प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रामदास हिराभाऊ जगताप आणि सफाई कामगार हरेश सोनवणे यांना २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागात कार्यरत असलेल्या वर्ग-१ च्या अधिकाऱ्यावर ही कारवाई झाल्याने संपूर्ण सिडको प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचे सिडकोच्या २२.५ टक्के योजनेअंतर्गत करारनामा नोंदणीचे काम प्रलंबित होते. या फाईलला मंजुरी देण्याच्या मोबदल्यात मुख्य भूमी व भूमापन अधिकारी रामदास जगताप यांनी लाचेची मागणी केली होती. या संदर्भात ११ मे २०२६ रोजी नवी मुंबई ‘एसीबी’ कार्यालयात तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपी हरेश सोनवणे याने जगताप यांच्या वतीने सुरुवातीला ४५ हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र तडजोडीनंतर २२ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. रामदास जगताप यांनी सोनवणे याच्या माध्यमातून या लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिल्याचेही निष्पन्न झाले.

या माहितीच्या आधारे १३ मे २०२६ रोजी सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच हरेश सोनवणे याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर तातडीने कारवाई करत मुख्य अधिकारी रामदास जगताप यांनाही त्यांच्या दालनातून ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, नवी मुंबई एसीबी युनिट अधिक तपास करत आहे. या कारवाईमुळे सिडकोतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राज्यभराचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!