वैशाली कडू
उरण : कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी-चिरनेर जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. जंगलात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत असल्याची माहिती समजते. यामुळे रहिवाशी भितीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेची पडताळणी करून बिबट्याचा शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी, रहिवासी करत आहेत.

पनवेल-उरण या तालुक्याला डोंगर परिसराने वेढले आहे. या तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यालगत शासनाच्या अधिपत्याखालील कर्नाळा पक्षी अभयारण्य असून अनेकवेळा या परिसरातील जंगलात बिबट्या आढळून आल्याचे या जंगल परिसरातील शेतकरी, रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच शनिवार (दि. 23) व रविवार (दि. 24) या दिवसात दिघाटी, चिरनेर गाव परिसरातील शेतकरी, रहिवाशी हे जंगल परिसरात गेले असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी चिरनेर गाव परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात इतर वन प्राण्याप्रमाणे बिबट्याचाही वावर असू शकतो. शेतकऱ्यांनी,रहिवाशांनी घाबरून न जाता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. याबाबत दिघाटी जंगलात पाहणी करण्यात येत आहे. जंगलाचे साम्राज्य या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरल्याने बिबट्याचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी रहिवाशांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
–हेमंत करादे,
वन अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य
